कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री

'संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार आहे'

Updated: May 12, 2020, 10:08 PM IST
कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींनी संकेत दिले आहेत. तर १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा, याचं नियोजन करुन ते कळवण्याचं, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या संवादात सांगितलं आहे.

पावसाळा तोंडावर असताना कोरोना संकटाशी लढतांना साथीचे आजार आणि इतर रोगांचाही सामना करावा लागू  शकतो. त्यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टरांना नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतीय याकडे पाहावे लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणावे. त्याशिवाय आरोग्य विषयक बाबींवर भर देऊन, रिक्त पदे भरावी लागणार असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

पुढील काळात लॉकडाऊन शिथिल करतांना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा सरसकट सुरु करता येणार नाहीत. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक बंधनं पाळली जाण्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखून तो कंटेन्मेंट झोनबाहेर जाऊ देऊ नये. आता मोठ्या प्रमाणात मजुरांचं ये-जा सुरु झाली असून अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे. संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यश मिळालं आहे. मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यादृष्टीने साथीचे रुग्ण कोणते, कोरोनाचे रुग्ण कोणते याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन वैद्यकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांनाही पूर्णपणे तयार ठेवावे लागणार आहे. विविध जिल्ह्यांच्या घेतलेल्या आढावा बैठकांमधून आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांत सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य आणीबाणी असताना दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणं ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरु झाले आहेत त्या भागात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली असल्याने या भागात कटाक्षाने काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र मजुरांची नावं योग्यरित्या नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत. त्यामुळे एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळाल्यास अधिक काळजी घेण्यास मदत होईल याबाबत रेल्वेला सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

त्याशिवाय उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे. उद्योग सुरु होत असताना कामगार त्यांच्या गावी परतत आहेत, त्यामुळे कामगारांची किती कमतरता जाणवते, हे पाहून स्थानिकांमधून उपलब्ध करुन देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.