नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला 'The Archies' पाहावा की नाही? वाचा Review

The Archies Review : स्टार किड्स सुहाना खान, अगस्त नंदा आणि खुशी कपूर यांचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात तीनही स्टारकिड्सचा आत्मविश्वास दिसून आला. 

राजीव कासले | Updated: Dec 7, 2023, 06:29 PM IST
नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला 'The Archies' पाहावा की नाही? वाचा Review title=

The Archies Review : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक सुहाना (Suhana Khan), महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि अभिनेत्री श्रीदेवीची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) याआधी आपल्या पालकांच्या नावाने ओळखले जात होते. पण आता त्यांनी स्वत:ची ओळख बनवण्याच्यादृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या स्टारकिड्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित द आर्चिज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) हा चित्रपटा प्रदर्शित झाला असून स्टारकिड्सने फिल्मी दुनियेत पदार्पण केलं आहे. 

दिग्दर्शक झोया अख्तरने (Zoya Akhtar) जेव्हा 'द आर्चीज' या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हा तिने एक वचन दिल होतं. 60 च्या दशकातील कॉमिक पात्र तिच्या चित्रपटात त्याच शैलीत दाखवली जातील जशी आपण आर्ची अँड्र्यूजची कथा वाचली आहे. या चित्रपटातील मुख्य पात्र असलेला आर्जीबाल्ड एंड्र्यूज उर्फ आर्ची हा एक सामान्य मुलगा आहे. आपल्या मित्रांबरोबर नवनवं साहस करण्याची त्याला आवड आहे. त्याची बालपणीची मैत्रिण आहे बेटी कूपर, पण त्याचं आहे प्रेम वेरोनिका लॉज. रेगी, जुगहेड, डिली आणि एथेल या पात्रांचाही या कथेत समावेश करण्यात आला आहे. झोयाने ही सगळी पात्र 'द आर्चीज'मधून एकत्र आणली आहेत.

आर्चिज चित्रपटाची कथा काय आहे?
चित्रपटाची कथा अगदी साधी आणि सरळ आहे. पण झोया अख्तरने आपल्या कल्पक दिग्दर्शनाने या सोप्या कथेत रंग भरले आहेत. चित्रपटाची सुरुवात आर्ची म्हणज अगस्त्य नंदापासून होते. अगस्त्य नंदा राहत असलेल्या हिल स्टेशन 'रिवरडेल'चा इतिहास सांगताना दिसतोय. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी एक अँग्लो-इंडियन जोडपं 'रिव्हरडेल' इथं स्थायिक झालं.. स्वातंत्र्यानंतर बरेच लोक परदेशात गेले आणि उरलेले लोक या सुंदर हिल स्टेशनवर राहिले. 'रिव्हरडेल'च्या मधोमध ग्रीन पार्क नावाची जागा आहे. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं मुल पाच वर्षांचं झालं की एक ग्रीन पार्कमध्ये एक झा़ड लावलं जातं. 

आर्चीच्या मित्रांचा एक ग्रुप आहे. यात बेट्टी कपूर (खुशी कपूर), जगहेड (मिहिर आहूजा), रेजी (वेदांग रैना), डिली (युवराज मेंडा) आणि एथल (डॉट) यांचा समवेश आहे. वेरोनिका लॉज (सुहाना खान) ही आर्चीची बेस्ट फ्रेंड दाखवण्यात आली आहे. वेरोनिका दोन वर्षांनी लंडनहून रिवरडेलमध्ये परतली आहे. इथं ती आपल्या सर्व मित्रांबरोबर शिक्षण आणि धमालमस्ती करतेय. पण तिच्या वडिलांचा हायरम लॉज (अली खान) यांचा वेगळाच विचार सुरु आहे. हायमर हे मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांना रिवरडेलमध्ये एक मोठा प्लाझा बांधायचा आहे. यासाठी त्यांना ग्रीनपार्कची जागा आवडलीय. पण यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना बेघर व्हावं लागणार व्हावं लागणार आहे. अशाच आर्ची आणि त्याचे मित्र ग्रीन पार्क वाचवण्याची धडपड करताना या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. 

चित्रपटाचं दिग्दर्शन
या चित्रपटात 1964 चा काळ दाखवण्यात आला आहे. अँग्लो-इंडियन समाजात लोक कसे राहत होते याची कल्पना हा चित्रपट पाहाताना येतो. कथेतील पात्र एकमेकांशी जोडली गेली आहेत, एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेतात आणि एकमेकांची काळजीही घेतात. रिवरडेल हे हिलस्टेशन रंगीबेरंगी आणि आनंदी आहे. अशा परिस्थितीत रिव्हरडेलच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांच्या समस्या वेळोवेळी जाणवतात. दिग्दर्शिका झोया अख्तरने त्या काळातील प्रत्येक पात्र जिवंत केलं आहे. चित्रपटाची कथा विणण्यात ती यशस्वी झालीय.

स्टारकिड्सचा अभिनय
आर्चीच्या भूमिकेत अगस्त्य नंदाने सुंदर काम केलं आहे. आपली नेमकं पात्रा काय आहे हे समजून त्याने ही भूमिका जीवंत केली आहे. सुहाना खान आणि खुशी कपूरच्या अभिनयातही आत्मविश्वास दिसून येतोय. सुहाना पहिल्यांदाच चित्रपटात काम करतेय असं संपूर्ण चित्रपटात कुठेही जाणवत नाही. वेरोनिकाच्या पात्रासाठी तीने आपलं शंभर टक्के योगदान दिलं आहे. बेट्टी कपूरच्या भूमिकेतील खुशी कपूरही लोकांच्या मनाला भावणारी आहे. याशिवाय मिहिर आहूजा, युवराज मेंडा, डॉट, वेदांग रैना या तरुणांनीही उत्तम भूमिका साकारली आहे. अली खान, कोयलपुरी आणि विनय पाठक यांच्यासारखे कसलेले कलाकार चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. 

'द आर्चीज' हा एक म्यूझीकल चित्रपट आहे आणि सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसतंय. गाणी गुणगणावीत इतकी चांगली आहेत, तर त्यावर बसवण्यात आलेला डान्सही लक्ष वेधून घेणारा आहे.