'...तर मी बॉलिवूड सोडणार', कंगना रणौतची मोठी घोषणा, 'चित्रपटातील आयुष्य खोटं असून...'

LokSabha Election: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या कंगनाने जर आपण निवडणूक जिंकलो तर बॉलिवूड सोडू शकतो अशी घोषणा केली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 6, 2024, 01:03 PM IST
'...तर मी बॉलिवूड सोडणार', कंगना रणौतची मोठी घोषणा, 'चित्रपटातील आयुष्य खोटं असून...' title=

LokSabha Election: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी येथून तिला उमेदवारी दिली आहे. कंगना रणैत सध्या लोकसभेचा जोरदार प्रचार करत आहे. आपला विजय होईल असा विश्वासही कंगना व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान कंगनाने 'आज तक'शी संवाद साधताना आपल्या बॉलिवूड करिअरसंबंधी मोठी घोषणा केली आहे. 

कंगनाने जर आपण लोकसभा निवडणूक जिंकलो तर हळूहळू बॉलिवूड सोडू शकते असं जाहीरच केलं आहे. याचं कारण आपल्याला एकाच कामावर लक्ष्य केंद्रीत करायचं असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. तू राजकारण आणि चित्रपट याच्यात तालमेळ कसा साधणार? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, "मला चित्रपटांमध्येही कंटाळा येतो. मी अभिनयही करतो, दिग्दर्शनही करते. जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन. मला एकाच कामावर लक्ष्य केंद्रीत करायला आवडेल". 

"जर लोकांना माझी गरज आहे असं मला वाटलं तर मी त्याच दिशेला प्रवास करेन. मी जर मंडीतून विजयी झाले तर मी राजकारणच करेन. मला अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते राजकारणात जाऊ नको असं सांगतात. तुम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांना सिद्ध होऊन दाखवावं लागतं. जर स्वत:च्या महत्वाकाक्षांमुळे लोकांना भोगावं लागत असेल तर ती योग्य बाब नाही. मी एक आलिशान आयुष्य जगलं आहे. आता जर लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळत असेल तर मी ती पूर्ण करेन. मला असं वाटतं की, सर्वात आधी लोकांना आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे," असं कंगनाने म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली की, "चित्रपटसृष्टीमधील आयुष्य खोटं असतं. ते वातावरण तयार केलेलं असतं. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार करण्यात येतं. पण राजकारणात वास्तविकता असते. लोकांसह त्यांच्या अपेक्षांनाही सत्यतेच्या कसोटीवर उतरवायचं असतं. मी आता सामाजिक सेवेत नवी असून बरंच काही शिकायचं आहे".

कंगनाने यावेळी घराणेशाहीवर भाष्य करताना म्हटलं की, "आपण घऱाणेशाहीला राजकारण आणि चित्रपटांपुरतं मर्यादित केलं आहे. घराणेशाहीची सर्वांना समस्या असली पाहिजे. या जगाचा कोणताच अंत नाही. तुम्हाला ममतेच्या प्रेमातून वरती यावं लागतं. आज मला लोक मंडीची मुलगी म्हणतात. हे माझं कुटुंब आहे. तुमची ममता तुम्हाला दुर्बळ करणारी नसावी".