लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

क्षितीज झारापकर यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 5, 2024, 03:14 PM IST
लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचे निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास title=

Actor Kshitij Zarapkar Passes Away : 'एकुलती एक', 'आयडियाची कल्पना' यांसारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी क्षितीज यांनी अखेरचा श्वास घेतला. क्षितीज झारापकर हे गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. क्षितीज झारापकर यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून क्षितीज झारापकर हे कर्करोगावर उपचार घेत होते. पण मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डरमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आज (5 मे) सकाळी 10 वाजताच्या सुमारास मुंबईतील एका खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव दादरमधील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

क्षितीज झारापकर यांचा अल्पपरिचय

क्षितीज झारापकर हे सध्या 'चर्चा तर होणारच' या नाटकात काम करत होते. यात ते आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर या दोघांसोबत काम करत होते. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होता. ते 'गोळाबेरीज', 'ठेंगा', 'एकुलती एक', 'आयडियाची कल्पना' यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'गोळाबेरीज', 'बायकोच्या नकळत' यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन क्षितीजने केले होते. तर 'ठेंगा' आणि 'एकुलती एक' या चित्रपटात ते अभिनेता म्हणून झळकले. त्यासोबतच ते ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सख्खे शेजारी’, ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातही झळकले.

एक अभ्यासू नट, एक अभ्यासू दिग्दर्शक अशी क्षितीज यांची ओळख होती. क्षितीज यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट आणि नाट्यविश्वातील एक अभ्यासू नट हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.