'...तो हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक

आता मिलिंद गवळींनी त्यांच्या एका दिग्दर्शक मित्राच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 19, 2024, 11:44 PM IST
'...तो हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक title=

Milind Gawali Emotional Post : विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. ते कायमच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारताना दिसतात. आता मिलिंद गवळींनी त्यांच्या एका दिग्दर्शक मित्राच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळींनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ते अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात झळकले. आता मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर तुझीच रे या चित्रपटातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते वायलीन वाजवताना दिसत आहेत. आता त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण कारळेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटादरम्यान घडलेल्या अनेक आठवणींबद्दलही सांगितले. 

मिलिंद गवळी प्रवीण कारळेंच्या आठवणीत भावूक

"प्रवीण कारळे, माझा खूप जुना मित्र झी टीव्ही १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत असताना “डाकघर आपणा घर” या मालिकेमध्ये त्यांनी मला काम दिलं होतं , मग २०१९ मध्ये अचानक प्रवीणचा फोन आला मला म्हणाला की एक सिनेमा करतोय, रोल अतिशय छान आहे माझी इच्छा आहे की हा रोल तू करावास, मी लगेच ‘हो‘ म्हटलं , कारण मला प्रवीण बरोबर काम करायची खूप इच्छा होतीच, २०-२१ वर्ष आम्हाला ऐकत्र काम करायचा योगच आला नव्हता, प्रवीण असा दिग्दर्शक होता ज्याला ऍक्टर्स बद्दल अतिशय आदर होता, खूप प्रेमाने आणि समजून उमजून तो एका कलाकाराकडून उत्तम काम करून घ्यायचा, अतिशय प्रेमळ आणि हसरा चेहरा, कामात अतिशय प्रामाणिक, एखादा पिक्चर हातात घेतला की त्याच्यावर रात्रंदिवस त्याचं काम सुरू असायचं, नवीन मुलांना घेऊन “तुझीच रे” नावाचा हा romantic चित्रपट प्रवीण करत होता, प्रियंका यादव, अक्षय, सुमुखी पेंडसे या चित्रपटातले कलाकार होते. 

सॅमसंग ग्रॅशियस हे वसईचे प्रोड्युसर होते, वसईच्या सुंदर गावामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालं, वसईच्या सुंदर किनारपट्टी जवळ आम्ही राहत होतो आणि तिकडेच जवळपास आम्ही त्या वाड्यांमध्ये, समुद्रावर शूटिंग करत होतो, वीस-बावीस दिवस या चित्रपटाचा शूटिंग चाललं होतं , memorable moments अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं, निर्माते सॅमसंग ही फॅमिली संगीताची आवड असलेली होती, दोघेही नवरा बायको छान गायचे, मिस्टर सॅमसंग उत्कृष्ट वायलीन वाजवायचे, मला या चित्रपटांमध्ये वायोलिन वाजवायला होतं, त्यांनी माझ्याकडून छान तयारी करून घेतली, या चित्रपटाचा शूटिंगच्या वेळेला दिग्दर्शक प्रवीण यांच्या हृदयाचे नुक्कतच ऑपरेशन झालं होतं, प्रवीण ज्या पद्धतीने काम करायचा, मेहनत करायचा, त्याच्या बायकोला म्हणजे सविताला खूप काळजी वाटायची, शूटिंगच्या दरम्यान तिच्या बोलण्यातून एकदा दोनदा ते मला जाणवलं सुद्धा होत, पण प्रवीण बिंदास्त होता, कामात स्वतःला झोकून द्यायचा, सिनेमा क्षेत्रामध्ये दिग्दर्शकाचं काम फार काही सोपं नसतं, त्याला सगळ्यांपेक्षा दहापट जास्ती मेहनत करावी लागते physical, as well as mental exertion .

मागच्या वर्षी २३ जून २०२३ प्रवीण कारळे हा हृदयविकाराच्या आजाराने निघून गेला, ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली, इतका गोड हसरा हुशार प्रेमळ मित्र परत आपल्याला कधीही भेटणार नाही याचं खूप दुःख झालं. काल ह्या चित्रपटातल्या वायलीन चा piece ऐकला, आणि प्रवीण अगदी डोळ्यासमोर येऊन उभा राहिला", असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान 'तुझीच रे' हा चित्रपट 21 जून 2019 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात मिलिंद गवळी, प्रियांका यादव, सुमुखी पेडेंसे, अजय राणे हे कलाकार झळकले. तर मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.