'तू असं का लिहिलंस...' संकर्षण कऱ्हाडेने राज ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितला किस्सा, म्हणाला 'त्या राजकीय कवितेवर...'

 संकर्षण कऱ्हाडेने एक कविता सादर करत सध्याची राजकीय परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

नम्रता पाटील | Updated: Apr 28, 2024, 01:42 PM IST
'तू असं का लिहिलंस...' संकर्षण कऱ्हाडेने राज ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितला किस्सा, म्हणाला 'त्या राजकीय कवितेवर...' title=

Sankarshan Karhade - Raj Thackeray Meet : मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा कायमच त्याच्या कवितांमुळे चर्चेत असतो. संकर्षण कऱ्हाडे हा सध्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमाचा प्रयोग ठाण्यात पार पडला. या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडेने एक कविता सादर करत सध्याची राजकीय परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

संकर्षण कऱ्हाडेने नुकतंच 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडेने त्याने केलेल्या कवितेवर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया काय होती? यावर त्याने भाष्य केले आहे. यावेळी संकर्षण कऱ्हाडेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन करुन त्याला घरी बोलावलं होतं, याचा एक किस्साही यावेळी सांगितला. त्यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे, विनोद तावडे या नेत्यांनीही संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेवर त्याला फोन करत प्रतिक्रिया दिली. 

संकर्षण कऱ्हाडे काय म्हणाला? 

"खरं सांगायचं झालं, गेल्या दोन दिवसांत माझा फोन खूप श्रीमंत झालाय. कारण, ही मोठी माणसं खरंच खूप मोठी असतात. आपण उगाच एकमेकांचे हेवेदावे करून चिखल करून घेतो. मला गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, विनोद तावडे साहेबांचा फोन येऊन गेला. सगळ्यांचे फोन येत आहेत. यांचे आवाज मी स्वत:च्या कानांनी ऐकले. शरद पवार साहेब माझ्याशी स्वत: नाही बोलले पण, त्यांच्या एका निकटवर्तीयाचा मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं मी तुमच्या सगळ्या कविता साहेबांना ऐकवतो. ही कवितादेखील मी त्यांना पाठवली आणि त्यांनीही ती ऐकली. या निवडणुका झाल्यावर तुम्ही एकदा या, त्यांना तासभर सगळ्या कविता ऐकवा.” असा त्यांचा निरोप आला. 

"त्यासोबतच विनोद तावडे साहेबांनी फोन केला, त्यांच्या पत्नीने मला कौतुकाचा मेसेज पाठवला. राज ठाकरेंनी मला फोन सकाळी 11 वाजता घरी भेटायला या, असं सांगितलं. मी सकाळी साडेसात वाजता मिरारोडवरून निघालो. मी बरोबर 9 वाजता शिवाजी पार्क परिसरात पोहोचलो आणि 11 वाजेपर्यंत मी तिथेच फेऱ्या मारत होतो. माझी तंतरली होती.  मी त्यांच्या घरात गेलो आणि आमच्या घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला मी आत येऊन बसलोय. तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपीच चेक करत होते. मी ही घटना राज ठाकरेंना सांगितली. ते खूपच मिश्किल आहेत. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्या घरातून निघालो, तेव्हा ते सुद्धा ‘घरच्यांना सांगा सुखरुप बाहेर पडलोय.”असे म्हणाले. 

"त्यांच्या राज ठाकरे होते, त्यांच्या पत्नी होत्या. बरं या चर्चेत कुठेही तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं यापैकी त्यांनी काहीच विचारलं नाही. तुझं काय चालूये, नाटक कसं सुरु आहे, कुठे राहतोस, घरी कोण कोण असतं, सिनेमा, भारत, महाराष्ट्र अशी सगळी चर्चा त्यांनी माझ्याशी आनंदाने केली. त्यांनी खूप मनमोकळा संवाद साधला. काल बरोबर 9.30 वाजता मला उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला होता. फार उत्कृष्ट कविता झालीये असं ते देखील म्हणाले. मी त्यांना विचारलं तुम्ही रागावलात का? तर ते म्हणाले, अजिबात नाही…आजच्या काळात असं खरं खरं लिहिणारं कोणीतरी पाहिजे ना…जेणेकरून आमच्यासमोर सुद्धा वस्तुस्थिती पोहोचते. इथून पुढे सुद्धा असंच छान छान लिहित राहा. याशिवाय आशिष शेलार सुद्धा लवकरच कार्यक्रम पाहायला येणार आहेत असं त्यांनी आमच्या निर्मात्यांना सांगितलंय” असे संकर्षण कऱ्हाडेने सांगितले. 

दरम्यान संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.