'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Mar 27, 2024, 08:37 PM IST
'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया title=

Supriya Pilgaonkar on Swatantrya Veer Savarkar Movie : रणदीप हुड्डाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य दाखवण्यात आले आहे. यात रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुप्रिया पिळगावकर यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. सुप्रिया पिळगावकर यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देताना सुप्रिया पिळगावकरांनी बालपणीची एक आठवण सांगितली आहे. 

सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया

"मी 12 वर्षाची असताना माझ्या वडिलांनी मला शाळेच्या सुट्ट्यादरम्यान एक पुस्तक वाचण्यासाठी दिले होतं. ते पुस्तक फार जाड होतं. माझी शाळेची सुट्टी संपेपर्यंत हे पुस्तक वाचून पूर्ण होईल, असं वडिलांना वाटत होतं. मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते पूर्ण होईपर्यंत ते बाजूला ठेवण्याची माझी इच्छाच झाली नाही. जेव्हा मी सुरुवातीला पुस्तक वाचायला घेतले तेव्हा मला अनेक अडथळे आले. 

मी अनेकदा मध्येच रडायचे, हुंदके द्याचे. मी ते पुस्तक अर्ध वाचल्यावर फारच सुन्न झाले होते. आता तेच पुस्तक वीर सावरकरांच्या चित्रपटाच्या रुपात पुन्हा जिवंत झालं. पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप! तुम्ही चित्रपट पाहिलात का?", असे सुप्रिया पिळगावकरांनी म्हटले आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कलेक्शन किती?

दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आतापर्यंत 9.15 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यंत कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला.