बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला सध्या मुंबईत आणलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 28, 2024, 10:13 AM IST
बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई title=

बॉलिवूड अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबई पोलीस सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात (Mahadev Betting App Case) सहभाग असल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. साहिल खान द लाय बूक अ‍ॅपशी जोडलेला होता, जे एक सट्टेबाजी अ‍ॅप असून महादेव बेटिंगच्या नेटवर्कचा भाग आहे.  छत्तीसगढ येथे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई हायकोर्टाने अंतिरम जामीन याचिका फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर साहिल खान मुंबई सोडून फरार झाला होता. विशेष तपास पथकाने 40 तासांच्या दीर्घ ऑपरेशननंतर त्याला अटक केली. यासाठी त्यांनी छत्तीसगड पोलिसांची मदत घेतली. सध्या त्याला मुंबईत आणलं जात असून, त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. साहिल खानने 'स्टाइल' आणि 'एक्स्क्यूज मी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली असून, आता यात साहिल खानचाही समावेश झाला आहे. साहिल खान लोट बुक 24/7 नावाच्या एका सट्टेबाजी अ‍ॅप वेबसाईटमध्ये भागीदार आहे, जे महादेव बेटिंग अ‍ॅप नेटवर्कचा भाग आहे. साहिल खानवर लायन बूकला प्रमोट करण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचा आरोप आहे. लायन बूकला प्रमोट केल्यानंतर त्याने भागीदार म्हणून लोटस बूक 24/7 अ‍ॅप लाँच केलं होतं. साहिल अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी आपल्या प्रसिद्धीचा वापर करत होता. तो सेलिब्रिटीजला आमंत्रित करुन ग्रँड पार्टी करायचा. 

विशेष तपास छत्तीसगडमधील काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक यांच्यातील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला महादेव बेटिंग अ‍ॅपच्या उपकंपनीचं प्रमोशन केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावण्यात आलं आहे. साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. 

26 वर्षं छोट्या तरुणीशी लग्न

साहिल खान आपल्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. फेब्रुवारी महिन्यात त्याने आपण दुसरं लग्न केल्याचा खुलासा केला होता. रशियात साखरपुडा झाल्यानंतर मिलेनाशी लग्न केल्याचं त्याने जाहीर केलं होतं. मिलेना साहिलपेक्षा वयाने 26 वर्षं लहान आहे. 2004 मध्ये त्याने इराणमध्ये जन्मलेली अभिनेत्री निगार खानशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर एकाच वर्षात दोघे विभक्त झाले होते.