'शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पूर्णपणे निर्दोष', ED च्या कारवाईनंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया

प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

Updated: Apr 18, 2024, 04:32 PM IST
'शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पूर्णपणे निर्दोष', ED च्या कारवाईनंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया title=

Shilpa Shetty-Raj Kundra Bitcoin Ponzi Scam : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीचा जुहूमधील बंगल्याचाही समावेश आहे. प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी त्यांच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. "शिल्पा आणि राज हे पूर्णपणे निर्दोष आहेत. ते तपासात पूर्ण सहकार्य करतील. त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या कारवाईनंतर आम्ही कायद्याचे पूर्णपणे पालन करु. तसेच मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्या सरंक्षणासाठी योग्य ती पावले उचलू", असे प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे. 

वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करता येणार नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जेव्हा ईडीसमोर जाऊ तेव्हा आमचे जे काही म्हणणे आहे ते मांडू. त्यानंतर ते आम्हाला न्याय देतील, अशा आम्हाला विश्वास आहे. तसेच याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही अधिकाऱ्यांना याप्रकरणी पूर्ण सहकार्यही करु", असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या होत्या. त्याआधारे ईडीने तपास सुरू केला. आरोपींनी त्यांनी बिटकॉइन्सच्या रूपात 10 टक्के दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात लोकांकडून निधी गोळा केल्याचा आरोप आहे. हा निधी तब्बल ६६०० कोटी रुपये असल्याचा आरोप आहे. 

गोळा केलेल्या बिटकॉइन्सचा वापर बिटकॉइन गुंतवणुकीत करण्यात आला. त्याद्वारे गुंतवणूकदारांना कूट चलनात मोठा परतावा मिळणार होता. परंतु प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. ईडीने केलेल्या तपासणीनुसार, राज कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेनबिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स मिळाले होते. हे बिटकॉइन्स अमितने लोकांना फसवून जमा केलेल्या पैशांमधून घेतले होते. राज व अमित यांची डील पूर्ण होऊ शकली नाही, पण ते २८५ बिटकॉइन्स अजुनही त्याच्याजवळ आहेत, ज्यांची सध्याची किंमत 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

याप्रकरणी सिम्पी भारद्वाज, नितीन गौर आणि निखिल महाजन या तिघांना अटक करण्यात आली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज हे अजुन फरार आहेत.