तारक मेहता...' मधील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, धाकट्या बहिणीचे निधन

डिंपल ही गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. 

नम्रता पाटील | Updated: Apr 18, 2024, 03:45 PM IST
तारक मेहता...' मधील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, धाकट्या बहिणीचे निधन title=

Jennifer Mistry Sister Dimple Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमात मिसेस सोढी हे पात्र साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची बहिण डिंपलचे निधन झाले आहे. डिंपल ही गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वयाच्या 45 व्या वर्षी डिंपलने अखेरचा श्वास घेतला. आता जेनिफरने तिच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

जेनिफरची भावनिक पोस्ट

जेनिफरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "माझी लाडकी बहिण, तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करु शकत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कसे जगायचे, हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे. परिस्थिती कशीही असली तरी तू आम्हाला हसायला शिकवलेस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो", असे जेनिफरने म्हटले आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफर म्हणाली, गेल्या काही वर्षांपासून मी खूप अडचणींचा सामना करत आहे. यामुळे मला धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वी माझ्या भावाचे निधन झाले. त्यानंतर मला तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर आता माझ्या बहिणीचे निधन झाले. ती माझ्या खूप जवळ होती. पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही तिला उत्तम सुविधा देऊ शकलो नाही. पण मी आत्माच्या प्रवासावर विश्वास ठेवते आणि कदाचित तिच्या जाण्याची वेळ आली असावी. डिंपलच्या निधनाचा माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे. 

प्रकृती खालावली

जेनिफर मिस्त्रीची बहिण डिंपल ही दिव्यांग होती. तिचे निधन 13 एप्रिल 2024 रोजी तिच्या मूळगावी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झाले.  जेनिफरची बहिण डिंपलला गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, डिंपलला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिचे बीपी खूपच कमी होते. तिच्या पित्ताशयातही दगड होते. रुग्णालयाचे बिल वाढत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी त्यांची प्रकृती सुधारली. मात्र अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिची प्रकृती खालावत गेली. अथक प्रयत्नानंतरही तिला वाचवण्यात यश आले नाही. 

दरम्यान जेनिफर मिस्त्री बन्सीवालच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने रोशन सिंग सोढीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या पात्रामुळेच ती घराघरात पोहोचली.