हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी

अभ्यासात समोर आलं आहे की, सलूनमध्ये गेल्यानंतर तरुणीला मूत्रपिंडासंबंधी त्रास जाणवू लागला होता.   

शिवराज यादव | Updated: Mar 29, 2024, 05:26 PM IST
हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी title=

सलूनमध्ये हेअर स्ट्रेटनिंगची प्रक्रिया केल्यानंतर एका 26 वर्षीय तरुणीची किडनी खराब झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.  The New England Journal of Medicine मध्ये यासंबंधीचा अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये डॉक्टरांनी सविस्तरपणे तरुणीसह नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. दरम्यान यामध्ये तरुणीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. तरुणीवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितलं आहे की, हेअर स्ट्रेटनिंगसाठी वापरण्यात आलेल्या उत्पादनांपैकी एकामुळे तिच्या अवयवांना दुखापत झाली आहे. तरुणी जून 2020, एप्रिल 2021 आणि जुलै 2022 मध्ये केसांवरील प्रक्रियेसाठी गेली होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  

तरुणीला याआधी आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्या नव्हत्या. मात्र सलूनमध्ये जाऊन आल्यानंतर दरवेळी तिला उलटी, जुलाब, ताप आणि पाठदुखीचा त्रास जाणवत होता. दरम्यान प्रक्रिया सुरु असताना उपचारादरम्यान तिच्या टाळूवर जळजळ झाल्याची आणि तिच्या डोक्यावर अल्सर विकसित झाल्याचंही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

तरुणीच्या रक्तात क्रिएटिनिनची पातळी वाढल्याचं आढळून आल्यानंतर डॉक्टरांना तिची किडनी खराब झाल्याचं लक्षात आलं. तिच्या लघवीत रक्त आढळल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्यास सांगितले. परंतु त्यात संसर्गाचे दुसरं कोणतंही लक्षण दिसून आलं नाही. तसंच तिची किडनीदेखील ब्लॉक झालेली नव्हती.

तरुणीने डॉक्टरांना आपल्या केसांवर ग्लायऑक्सिलिक ॲसिड हे रसायन असलेल्या स्ट्रेटनिंग क्रीमने उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळेच तिची टाळू जळली आणि व्रण झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. उंदरांवर प्रयोग केला अससता हे ऍसिड तिच्या त्वचेतून शोषलं जातं आणि मूत्रपिंडापर्यंत पोहोचून नुकसान पोहोचवत असल्याचं सिद्ध झालं. 

अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, ऑक्सलेट नेफ्रोपॅथीमुळे महिलेला तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीचा वारंवार सामना करावा लागला. हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामुळे मूत्रपिंडाच्या नलिकांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स तयार झाल्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी होते. तसंच केस सरळ करण्याच्या प्रक्रियेमुळे ग्लायऑक्सिलिक ऍसिड जबाबदार असल्याचा पुरावाही मिळतो.

"या उत्पादनांमध्ये ग्लायऑक्सिलिक ऍसिडच्या वापरावर बंदी घालणे आणि उत्पादकांनी दुसरं, सुरक्षित कंपाऊंड शोधण्याची विनंती करणं शहाणपणाचं आहे," असं मेरीलँड विद्यापीठातील औषध आणि फार्मसीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जोशुआ डेव्हिड किंग यांनी लाइव्ह सायन्सला सांगितलं आहे.