पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा...; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार

आरोपी आणि त्याच्या पत्नीने आपले आक्षेपार्ह फोटो वापरुन ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा आरोप आहे. तसंत त्यांनी आपल्यावर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचंही तिने तक्रारीत सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 09:38 AM IST
पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा...; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार title=

कर्नाटकात एका विवाहित महिलेवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महिलेचे आक्षेपार्ह फोटो वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रारीत आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. आरोपीने पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला. तसंच भांगेत कुंकू लावण्याऐवजी डोक्यावर बुरखा घेण्यास सांगितलं असा तरुणीचा आरोप आहे. 

आरोपीचं नाव रफीक आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने महिलेची दिशाभूल करत तिला लैंगिक गोष्टींमध्ये सहभागी करुन घेतलं. यादरम्यान त्यांनी तिचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. या फोटोंच्या माध्यमातून त्यांनी तिला ब्लॅकमेल केलं आणि हिंदू धर्म सोडून इस्लाम स्विकारण्यास जबरदस्ती केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक आणि त्याच्या पत्नीने महिलेला 2023 मध्ये आपलं घर सोडून बेळगावमधील आपल्या घरी येऊन राहण्यास भाग पाडलं होतं. यावेळी त्यांनी तिला आपण जे काही सांगू ते करावं लागेल असं म्हटलं होतं. तिघेही एकाच घरात राहत होते. यादरम्यान रफीकने गतवर्षी आपल्या पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला.

या वर्षी एप्रिलमध्ये, या जोडप्याने कथितपणे महिलेला 'कुमकुम' न लावता बुरखा घालण्यास आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास भाग पाडलं, असं बेळगावचे एसपी भीमाशंकर गुलेडा यांनी सांगितलं आहे. 

आपल्याविरोधात जातीवाचक टिप्पणी करण्यात आल्याचाही महिलेचा आरोप आहे. तसंच आरोपीने आपल्याला खालच्या जातीची असल्याने धर्मांतर करावं लागेल असं म्हटलं होतं असाही आरोप केला आहे. 

रफिकने महिलेला तिच्या पतीला घटस्फोट देण्यास सांगितलं आणि जर तिने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तिचे आक्षेपार्ह फोटो लीक करण्याची धमकी दिली, असं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. तिने पुढे सांगितलं की, या जोडप्याने धर्मांतर न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्नाटक धर्म स्वातंत्र्याचा हक्क संरक्षण कायदा, आयटी कायद्याचे संबंधित कलम, एससी/एसटी कायदा आणि भारतीय दंड संहिता, बलात्कार, अपहरण, चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.