चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 28, 2023, 04:34 PM IST
चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण title=

The launch of Aditya-L1 : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार आहे. येत्या 2 सप्टेंबरला इस्रोमार्फत आदित्य एल-1 लॉन्च केलं जाणार आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी भारतानं ही महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. सूर्यावर होणा-या विस्फोटांमधून मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती होत असते. या विस्फोटांचा परिणाम पृथ्वीवरही होत असतो. एव्हढंच नाही तर सौरविस्फोटांचा अंतराळातील दूरसंचार प्रणालीलाही फटका बसतो. त्यामुळे सुर्यावरील चुंबकीय घडामोडींसह तिथल्या विस्फोटांच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं हे मोठं पाऊल उचलल आहे.  

आदित्य एल-1 मिशन नेमकं काय आहे?

चंद्रानंतर आता इस्त्रोला सूर्यही खुणावत आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो मिशन आदित्य राबवणार आहे. 2 सप्टेंबरला हे यान प्रक्षेपित करण्यात येईल. श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून या यानाचे प्रक्षेपण होणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी ही इस्त्रोची अंतराळातली पहिली वेधशाळा असेल. मिशन आदित्य हे इस्त्रोचं सर्वात कठीण मिशन आहे. मात्र, हे मिशन अंतराळ संशोधनात एक नवा अध्याय लिहिणार आहे. 

120 दिवसांचं मिशन आदित्य

सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 8 मिनिटं लागतात. पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर हे 15 कोटी किलोमीटर इतकी आहे. तेव्हा हे मिशन आदित्य साधारण 120 दिवसांचं म्हणजे 4 महिन्यांचं असेल.. सूर्याच्या कक्षेत पोहोचल्यावर तिथल्या सौर वातावरणाचा अभ्यास करुन ती माहिती पृथ्वीवर पाठवली जाईल.