इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

Iran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 15, 2024, 12:21 PM IST
इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम title=
दोन्ही देशांमधील तणाव वाढला

Iran Israel War Impact On Indians: इराणने बॅलेस्टिक मिलाईल्स, क्रूज मिसाइल्स आणि ड्रोन्सच्या माध्यमातून रविवारी केलेला अनपेक्षित हल्ला रोखण्यात आपल्याला यश आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहाचला आहे. या दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढून परिस्थिती चिघळू शकते. आता हजारो किलोमीटर दूर सुरु असलेल्या या युद्धाचं आपल्याला काय? असं तुम्हाला वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण या युद्धाचा फटका थेट तुमच्या मासिक बजेटला बसू शकतो. युरोपीयन राष्ट्र, अमेरिकेसहीत भारतावरही या युद्ध संकटाचा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारताचे आर्थिक हितसंबंधही धोक्यात आले आहेत.

सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला झळा

इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे आर्थिक परिणाम भारताला भोगावे लागू शकतात. भारताने इराणबरोबर अनेक द्विपक्षीय करार केलेले आहेत. त्यातही चाबहार बंदराच्या विकासाचा प्रकल्प भारत राबवत असून त्याच मोठी गुंतवणूक केलेली आहे. या प्रांतातील व्यापारी मार्गांवरील सेवा वाढवणं आणि कनेक्टिव्हीटी अधिक सदृढ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत व्यापार अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे भारतातील मरागाई वाढू शकते. या युद्धामुळे कच्च्या तेल्याची किंमत 100 डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर वाढण्यामागे अंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले तणावपूर्ण संबंधच कारणीभूत मानले जात आहेत. खरोखरच कच्च्या तेलाचे दर वाढले तर याचा खेच परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर होऊ शकतो. त्यामुळे अगदी भाज्या, धान्याच्या किंमती वाढून सर्वसामान्यांचं मासिक बजेट कोलमडू शकतं. परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ होऊ शकते. अंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे मागणी व पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. असं काहीही झालं तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

ऑक्टोबरनंतरचे सर्वाधिक दर

इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होऊ शकतो. युद्धामध्ये तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकतात. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेल आणि इंधनाच्या दरांवर होऊ शकतो. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 92.2 डॉलर प्रति बॅरलवर पोहचलं आहे. ऑक्टोबर महिन्यानंतरचा हा सर्वाधिक दर आहे. सध्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक असल्याने जूनच्या मध्यपार्यंत इंधनाचे दर वाढण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. मात्र याचा परिणाम तेल रिटेल विक्रेत्यांच्या नफ्यावर पडू शकतो.

सरकारी तिजोरीतून खर्च

तेल आणि गॅसचे दर वाढले तर सरकारला सबसिडी बिल जारी करावं लागलं. सरकारला विशेष सवलती द्याव्या लागतील ज्याचा थेट परिणाम सरकारी तिजोरीवर होईल. तेलाच्या किंमती वाढल्यास चलन अस्थिर होतं असं तज्ज्ञ सांगतात. तेल आयात करणं आणि त्यासाठी लागणारा खर्चही वाढतो. एका क्षमतेनंतर सरकारी तिजोरीतून सबसिडीच्या रुपात अधिक पैसा खर्च करणं शक्य होतं नाही.

समतोल बिघडणार

तेलाची किंमत वाढल्यास रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत होईल. वस्तू आयात करण्याच्या दृष्टीने हे अर्थव्यवस्थेसाठी आणि चलनाच्या मुल्यासाठी चिंताजनक ठरु शकतं. अमेरिकेतील खरेदीदार किती उत्सुक आहेत यावर भारतीय निर्यात अवलंबून असेल आणि त्यावरच पर्यायाने रुपयाचं मूल्य अवलंबून असेल. कोणत्याही कारणाने पश्चिम आशियाच्या इतर देशांमध्ये इराण आणि इस्रायलमधील तणाव पसरला आणि त्याचा परिणाम सागरी व्यापारी मार्गांवर झाल्यास निर्यातीचा खर्च वाढेल. यामुळे आयात आणि निर्यातीमध्ये तफावत निर्माण होईल. जहाजे आणि तेलाच्या टँकर्सवर हल्ले होत असल्याने युरोपीय देश आणि अमेरिका उशीराने हे टँकर्स पाठवण्याबरोबरच त्यासाठी टाळाटाळ करण्याचे प्रकारही घडू शकतात.