'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये निवडणुकी रॅलीला संबोधित करताना तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राजीव कासले | Updated: Apr 26, 2024, 02:12 PM IST
'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले? title=

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील 12 राज्यांतील तब्बल 89 मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान करण्यात येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचं अभिनंदन केलं आहे. तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तृणमुल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी विरोधकांना झिडाकरलंय, आणि हेच चित्र दुसऱ्या टप्प्यातही पाहायला मिळतंय. 

पश्चिम बंगालच्या मालदा उत्तर इथं बोलताना पीएम मोदी यांनी टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलंय. 'एक काळ असा होता जेव्हा बंगालने संपूर्ण देशाच्या विकासाचे नेतृत्व केलं होतं. पण, आधी डाव्यांनी आणि नंतर तृणमूलने बंगालच्या महानतेला धक्का पोहोचवलाय. बंगालच्या सन्मानाला धक्का लावलाय आणि बंगालचा विकास थांबवलाय. टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये एकच गोष्ट सुरू आहे आणि ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे. टीएमसी घोटाळा करते आणि बंगालच्या लोकांना याचं भुगतान करावं लागतं असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केलाय.

'महिलांबरोबर विश्वासघात' 
निवडणुकी रॅलीतली गर्दी पाहून पीएम मोदी भारावून गेले होते. बंगालच्या लोकांचं इतकं प्रेम पाहून माझा आधीची जन्म बंगालमध्ये झाला होता असं वाटतं, आता पुढचा जन्मही बंगालमध्ये कुठल्यातरी आईच्या कुशीत जन्म घेईन, असं पीएम मोदी यांनी म्हटलंय. बंगालमधल्या 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 8 हजार कोटी रुपये थेट जमा केले. पण बंगालमधलं टीएमसी सरकार जनतेला लुटण्याची एकही संधी सोडत नाहीए. केंद्राकडून बंगालच्या विकासासाठी जितका पैसा पाठवला जातो, तो सर्व टीएमसी नेता, मंत्री आणि दलाल खातात असा सनसनाटी आरोपही पीएम मोदी यांनी केलाय.

मा-माती आणि मानुषच्या गप्पा मारून सत्तेत आलेल्या टीएमसीने इथल्या महिलांचा सर्वात मोठा विश्वासघात केला आहे. मुस्लिम भगिनींना अत्याचारापासून वाचवण्यासाठी भाजप सरकारने तिहेरी तलाक रद्द केला, याला टीएमसीने त्याला विरोध केला. संदेशखालीमध्ये महिलांवर अतोनात अत्याचार झाले पण टीएमसी सरकारकडून त्यांच्या नेत्यांना वचावलं जातंय.

टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र ठेवण्याचे सर्वात मोठे चुंबक म्हणजे तुष्टीकरण आहे, हे दोन्ही पक्ष तुष्टीकरणासाठी काहीही करू शकतात असा आरोप पीएम मोदी यांनी केलाय. या लोकांना राष्ट्रहिताचा प्रत्येक निर्णय मागे घ्यायचा आहे. त्यांच्यात तुष्टीकरणाची स्पर्धा सुरू आहे. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचं काम टीएमसी सरकार काम करतंय. या घुसखोरांकडून तुमच्या जमिनी आणि शेतीचा ताबा घेतला जातोय. अशा व्होट बँकांमध्ये तुमची संपत्ती वाटण्याचा डाव काँग्रेसचा असल्याचा आरोपही पीएम मोदी यांनी केलाय.