'राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं...'; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान

Anurag Thakur On Rahul Gandhi Marriage: हिमाचल प्रदेशमध्ये जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळामध्ये मंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 29, 2024, 08:35 AM IST
'राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं...'; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान title=
जाहीर सभेत राहुल गांधींवर साधला निशाणा

Anurag Thakur On Rahul Gandhi Marriage: काँग्रेसने लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्द्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अविवाहित असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकूर यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.

राजीव गांधींनी तो कायदा रद्द केला

हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर येथील जाहीर सभेला संबोधित करताना ठाकूर यांनी राहुल गांधींना लग्न करता आलं नाही आणि आता त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती हवी आहे, असं विधान केलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळादरम्यान 55 टक्के संपत्ती सरकारला जाईल, असा कायदा होता. मात्र 'त्यांनी तो कायदा रद्द केला आणि स्वत:ची संपत्ती वाचवली,' असा दावाही अनुराग ठाकूर यांनी भाषणात केला.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात परदेशी ताकदीचा हात

"काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसच्या हाताबरोबरच परदेशी ताकदींचा हातही आहे. ज्यांना तुमची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे. देशाची अण्विक शस्त्रं संपवायची आहेत. देशात जात आणि प्रांतांच्या आधारे फूट पाडायची आहे. या 'तुकडे-तुकडे गँग'ने काँग्रेसला वेढलेलं आहे. त्यांनी काँग्रेसच्या विचारसणीवर ताबा मिळवला आहे," असा दावा अनुराग ठाकूर यांनी जाहीर भाषणात केला.

मोदींना साथ द्यायची की 'तुकडे-तुकडे गँग'ला ठरवा

"तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काँग्रेसच्या 'तुकडे-तुकडे गँग'बरोबर जायचं आङे की नरेंद्र मोदींबरोबर जायचं आहे जे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'वर विश्वास ठेवतात. तुमच्या मुलांची संपत्ती त्यांच्याकडेच रहावी की मुस्लिमांना जावी हे तुम्हाला ठरवायचं आहे. आपण मुस्लिमांना सर्व समान हक्क दिले आहेत," असंही ठाकूर यांनी जाहीर सभेत म्हटलं.

राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर...

"राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस एक कायदा होता. त्या कायद्यानुसार 55 टक्के संपत्ती सरकारला जायची. मात्र त्यांनी तो कायदा रद्द करुन स्वत:ची संपत्ती वाचवली. राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं म्हणणं आहे की, तुमच्या मुलांची संपत्ती ताब्यात घेतली जावी. गांधी कुटुंब त्यांना जे सूट होतं ते करतात," असं अनुराग ठाकूर म्हणाले.