'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्यांना 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video

Men With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 10, 2024, 04:13 PM IST
'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्यांना 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video title=
जाहीर भाषणामध्ये केलं हे विधान

Men With Two Wives Will Get Rs 2 Lakh:  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार मतदारांना अनेक आश्वासने देतात. रस्ते, पाणी, शाळा आणि इतर सुविधांसंदर्भातील घोषणा तर सामान्य आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील एका काँग्रेस उमेदवाराने दिलेल्या आश्वासनामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गुरुवारी काँग्रेसच्या या उमेदवाराने जाहीर सभेमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास दोन पत्नी असलेल्यांना 2 लाख रुपये दिले जातील असं आश्वासन दिलं आहे. 

प्रत्येक महिलेला 1 लाख देणार

काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत मध्य प्रदेशमधील रतलाम मतदारसंघातील उमेदवार कांतिलाल भुरिया यांनी जाहीर सभेत महिलांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. आमचा पक्ष सत्तेत आला तर, "प्रत्येक घरातील महिलेला 1 लाख रुपये दिले जातील" असं भुरिया म्हणाले. "काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यातील आमच्या जाहीरनाम्यानुसार प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 1 लाख रुपये जमा केले जातील. प्रत्येक घरातील एका महिलेला प्रत्येकी 1-1 लाख रुपये मिळतील," असं आश्वासन भुरिया यांनी दिलं.

ते विधान ऐकताच पिकला हशा

भुरिया यांनी दिलेलं हे आश्वासन इथपर्यंत तरी ठीक होतं. मात्र पुढे बोलताना भुरिया यांनी, "ज्यांना 2 बायका (पत्नी) आहेत त्यांना 2 लाख रुपये मिळतील" असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे कांतिलाल भुरिया  हे मागील पाच वेळा इथून लोकसभेची निवडणूक जिंकलेले आहेत. त्यांच्या विधानानंतर काय घडलं पाहा व्हिडीओ...

काँग्रेसची ही नेमकी योजना काय?

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेनुसार दरवर्षी 'गरीब घरातील एका महिलेला' एक लाख रुपये दिले जातील. गरीबी नष्ट करण्यासाठी ही योजना लागू केली जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. घरातील सर्वात तरुण महिलेच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल. सर्वात कमी वयाची तरुणी नसेल तर हे पैसे घरातील सर्वातील वयस्कर महिलेच्या खात्यावर जमा केली जाईल. ही योजना टप्प्याटप्प्यात लागू केली जाईल. या योजनेचा दरवर्षी आढावा घेतला जाईल. गरीबी हटवण्यासाठी ही योजना किती परिणामकारक ठरते हे तपासून पुढे निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. 

नक्की पाहा >> भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

राहुल गांधींनीही दिलेली या योजनेची माहिती

या योजनेबद्दल राहुल गांधींनी सविस्तर माहिती दिली होती. 'इंडिया आघाडी'चं सरकार सत्तेत आल्यास आर्थिक गरजवंताच्या घराची यादी तयार केली जाईल. यामध्ये आदिवासी, दलित, ओबीसी समाजातील घटकांचाही समावेश असेल. दारिद्ररेषेखालील कुटुंबांची मोजणी करुन त्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर या कुटुंबाला महिन्याला 8500 रुपये दिले जातील. हे कुटुंब गरिबीमधून वर येत नाही तोपर्यंत त्यांना वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील.