नरेंद्र मोदींचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, स्वत: पंतप्रधानांनी पाहिला VIDEO; म्हणाले 'हे तर फारच...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक व्हिडीओची दखल घेतली असून ChatGpt टीमकडे यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तसंच असे व्हिडीओ व्हायरल झाल्यास चेतावणी देण्याची सूचना केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2023, 03:47 PM IST
नरेंद्र मोदींचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, स्वत: पंतप्रधानांनी पाहिला VIDEO; म्हणाले 'हे तर फारच...' title=

अभिनेत्री रश्मिका मंधानाला टार्गेट करण्यात आल्यानंतर डीपफेक व्हिडीओ चर्चेत असून, यासंबंधी चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक व्हिडीओ तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर केला जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं. तसंच हा फार चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपण ChatGpt कडे डीपफेक व्हिडीओचा मुद्दा मांडला असून, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तात्काळ चेतावणी जारी करा सांगितल्याची माहिती दिली. 

नरेंद्र मोदींनी यावेळी आपला गरबा गाणं गातानाचा डीपफेक व्हिडीओ पाहिला असल्याची माहिती दिली. "मी एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये मी गरब्याचं गाणं गाताना दाखवलं आहे. असे अनेक व्हिडीओ ऑनलाइन उपलब्ध आहेत", असं नरेंद्र मोदी म्हणाले. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या 'दिवाळी मिलन' कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी पत्रकारांना लोकांना याबाबत सुशिक्षित करण्याचं आवाहन केलं. 

"आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या या काळात आपण फार जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत रश्मिका, कतरिना आणि काजोल यांचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर सोशल मीडियावर संताप आणि चिंता व्यक्त केली जात असतानाच नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे. 

या व्हिडिओमुळे छेडछाडीच्या परिणामांबद्दल चिंता निर्माण केली आहे. खासकरुन सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींना यामुळे चिंता सतावत आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक सेलिब्रिटींनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सल्ला देणारं निवेदन जारी केलं आहे. ज्यामध्ये असे डीपफेक व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तसंच दंड आकारला जाण्याचा उल्लेख केला होता. 

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे की, चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखणे हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर बंधन आहे. रिपोर्ट केल्यानंतर 36 तासांच्या आत अशा प्रकारची कोणतीही सामग्री काढून टाका आणि आयटी नियमांनुसार निर्धारित वेळेत त्वरित कारवाई सुनिश्चित करा. तसंच ती सामग्री काढून टाका. 

डिजिटल स्पेसमध्ये भारतीयांसाठी सुरक्षितता आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसंच डीपफेक तयार केल्यास आणि तो शेअऱ करणं यासाठी 1 लाख दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा असल्याचं केंद्राने सांगितलं आहे.