'काँग्रेस फूटून 'राहुल काँग्रेस', 'प्रियंका काँग्रेस' तयार होणार'; तारीख सांगत भविष्यवाणी

Congress Will Split Into 2 Factions: सध्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या आघाडी आणि युतीमध्ये निवडणूक लढत आहेत. असं असतानाच आता काँग्रेसमध्ये फूट पडेल असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 6, 2024, 11:48 AM IST
'काँग्रेस फूटून 'राहुल काँग्रेस', 'प्रियंका काँग्रेस' तयार होणार'; तारीख सांगत भविष्यवाणी title=
प्रियंका यांच्या माजी सहकाऱ्याचा स्फोटक दावा

Congress Will Split Into 2 Factions: महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. शिवसेनेमध्ये विद्मयान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी फूट पडली आणि शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीबरोबर युती करत सत्ता स्थापन केली. या राजकीय भुकंपामुळे राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेना, काँग्रेस आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच फूट पडली आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठा गट शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला. सध्या राज्यात लढवल्या जात असलेल्या निवडणुकीमध्ये शिंदे गट भाजपा आणि अजित पवार गटाबरोबर महायुतीमध्ये निवडणूक लढतोय तर ठाकरे गट हा काँग्रेस आणि शरद पवार गटाबरोबर महाविकास आघाडीमधून निवडणूक लढत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांपैकी केवळ काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. मात्र हे चित्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच 4 जून नंतर बदलेलं असं भाकित पक्षातील एका माजी नेत्याने व्यक्त केलं आहे. 

राहुल गांधींच्या पळून जाण्याच्या धोरणामुळे...

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे पूर्वीचे सहकारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींमध्ये मतभेद असल्याचं सूचक विधान केलं आहे. गांधी भाऊ-बहिणीमध्ये जमत नसल्याचं कृष्णम यांनी म्हटलं आहे. "राहुल गांधींचं जे पळून जाण्याचं धोरण आहे ते निंदा करण्यासारखं आहे. त्यांनी ज्यापद्धतीने अमेठी मतदारसंघ सोडला आहे ते पाहून देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं आहे," असा दावा कृष्णम यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार असं भाकित

पुढे बोलताना कृष्णम यांनी काँग्रेसमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे उभी फूट पडून दोन गट निर्माण होतील असा धक्कादायक दावा केला आहे. "प्रियंका गांधींचं निवडणूक न लढणंसुद्धा चर्चेत आहे. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक ज्वालामुखी धगधगत आहे. ज्याचा स्फोट 4 जूननंतर होईल. देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच दोन गट पडतील आणि हे अटळ आहे. 4 जूननंतर काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली जाईल. एक गट असेल राहुल गांधींचा आणि दुसरा गट असेल प्रियंका गांधींचा. काँग्रेस राहुल आणि काँग्रेस प्रियंका असे पक्षाचे दोन तुकडे झालेले असतील. 

राहुल गांधींनी रावळपिंडीतून लढायला हवं होतं कारण...

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेवटच्या ओळीत कृष्णम यांनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे. "राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीमधून निवडणूक लढायला हवी होती कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे," असं कृष्णम म्हणाले.