'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप

Ajit Pawar Chief Minister Post: मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली.

Pravin Dabholkar | Updated: Apr 28, 2024, 06:51 PM IST
'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप title=
Ajit Pawar accusation On Sharad Pawar

Ajit Pawar Chief Minister Post: अनेकदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाने नेहमी हुलकावणी दिली आहे. आता अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु असताना ते पद दुसऱ्याकडे जाते, असे त्यांच्या बाबतीत नेहमी होत आले आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या अजित पवारांनी आता मुख्यमंत्री व्हावं, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. मुख्यमंत्री कधी होणार? अजित पवार झी 24 तासच्या मुलाखतीत नुकतेच बोलले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी भरसभेत त्यांनी मुख्यमंत्री न होण्याचं कारणं सांगितलंय. याबद्दल जाणून घेऊया. 

मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली. हे सांगताना त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली. 

काय म्हणाले अजित पवार?

2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद आलं होतं. छगन भुजबळ, आर. आर. पाटील नाहीतर माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो, अशी खंत अजित पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ इथल्या सभेत व्यक्त केली. 

मुख्यमंत्रीपद आलं होतं... मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला, असा आरोपही अजित पवारांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद विषयावरुन काका-पुतण्यामध्ये आगामी काळात कलगीतुरा रंगताना दिसणार आहे. 

कधी होणार मुख्यमंत्री?

27 एप्रिललाच अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केले होते.अनेकदा उपमुख्यमंत्री पद संभाळले पण अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना नेहमी पडलेला असतो. यासंदर्भात झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे होते. 

ज्या वेळेस अजित पवारांना 145 हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मुख्यमंत्री होईल, असे ते म्हणाले. आम्ही महायुतीत आलो तेव्हा आधीच शिवसेना-भाजपचे स्थिर सरकार होते. मग ते कशाला मुख्यमंत्रीपद देतील? ते म्हणतील आमचं व्यवस्थित चाललंय, असेच म्हणतील. त्यामुळे जेव्हा मला स्पष्ट बहुमत मिळेल तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईनं, असे अजित पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर

शरद पवारांवर टीका 

सुप्रिया सुळे दिल्लीत होत्या. अजित पवार राज्यात पक्ष संभाळत होते. सर्वकाही सुरळीत चालले असताना अचानक वेगळा निर्णय का? असा प्रश्न त्यांना झी 24 तासच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी नव्या पिढीला संधी मिळायला हवी. आता मी 64 वर्षाचा आहे, ते 74 वर्षांचे आहेत. आम्हीपण किती काळ थांबायचं? आम्हापण आमचं पुढंचं भवितव्य आहे. प्रत्येक वेळेस मी म्हणेल ती पूर्व दिशा असं म्हणून कसं चालेल. राजीनामा दिला आणि परत घेतला. कोण त्यांना विचारणार? असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण