'असं खोटं बोलून काय मिळतं?' 'त्या' Viral Video वरुन जय पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Baramati Lok Sabha Constituency: सध्या सुप्रिया सुळे आणि त्यांचा भाचा जय पवार यांच्या भेटीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. मात्र याच व्हिडीओवरुन आता जय पवार यांनी त्यांच्या आत्यावर म्हणजेच सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 23, 2024, 08:41 AM IST
'असं खोटं बोलून काय मिळतं?' 'त्या' Viral Video वरुन जय पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा title=
सुप्रिया सुळेंवर साधला निशाणा

Baramati Lok Sabha Constituency: बारामतीमधील लोकसभेचे निवडणूक ही भाऊबंधकीची नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून सांगितल्यानंतरही ही निवडणूक भाऊबंधकीच्या मुद्द्यावरुनच तापत असल्याचं चित्र दिसत आहे. नणंद विरुद्ध भावजय लढाईत पवार कुटुंबातील अनेक नातेवाईक सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभे असल्याचं दिसत आहे. सुप्रिया सुळे आणि जय पवारांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरुन आता जय पवार यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंनी हा व्हिडीओ काढायला लावून खोटी बातमी करायला लावल्याचा आरोप जय पवार यांनी केला आहे. खोटं बोलून सुप्रिया सुळेंना काय मिळतं? असा सवाल जय पवार यांनी उपस्थित केला आहे. 

कुठे झाली भेट?

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवारही सहभागी झाले आहेत. जय पवार यांनी भोर तालुक्यातील गावांना भेटी देण्यास आणि प्रचार दौरे काढण्यास सुरुवात केली आहे. याच प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांची आत्या सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांचा गैरवापर कसा करावा हे सुप्रिया सुळेंना योग्य पद्धतीने ठाऊक असल्याची टीका जय पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये महावीर जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भेटीचा संदर्भ जय पवार यांनी आपल्या भाषणात देत सुप्रिया सुळेंवर टीका केली. "बारामतीमधील जैन समाजाच्या कार्यक्रमामध्ये त्या (सुप्रिया सुळे) आणि मी एकत्र आहो. तेव्ही मी त्यांना पहिला नारळ तुम्ही ठेवा असं सांगितलं. त्यावर त्यांनी मला पहिला नारळ ठेवण्यास सांगितलं. त्याप्रमाणे मी पहिल्यांदा नारळ ठेवला," असं जय पवार म्हणाले.

...अन् तो व्हिडीओ व्हायरल केला

"मी नारळ ठेऊन डोळे बंद करुन प्रार्थना करत असतानाच बारामती शहराध्यक्ष जय पाटील माझ्या बाजूला उभे राहिले. मी प्रार्थना करताना त्यांनी (सुप्रिया सुळेंनी) काय जय कसं चाललंय? असा प्रश्न विचारला असता तो मला विचारलाय असं मला वाटलं. मी डोळे उघडून आता सगळं बरं आहे.  असं म्हणालो. तर त्यांनी मी तुला नाही, दुसऱ्या जयबरोबर बोलत होते, असं म्हटलं. या साऱ्या घटनेचे व्हिडीओ त्यांनी पत्रकारांना दिले, असा दावा जय पवार यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांची दिशाभूल करुन सुप्रिया सुळेंनी जय पवारांची चौकशी केली अशी खोटी बातमी करायला लावल्याचा आरोप जय पवार यांनी केला आहे. 'हे असं खोट बोलून त्यांना काय मिळालं?' असा सवाल जय पवारांनी केला.

संसदरत्नवरुनही साधला निशाणा

जय पवार यांनी संसदरत्न पुरस्कारावरुनही सुप्रिया सुळेंना टोला लगावला. हा पुरस्कार सरकारकडून दिला जात नाही तर तो एका सेवाभावी संस्थेकडून दिला जातो. त्यामुळे तो फार काही मोठा पुरस्कार नाही, असं जय पवार म्हणाले. मात्र हा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने भोर तालुक्याला काय मिळालं? असा सवाल जय पवार यांनी उपस्थित केला आहे.