कल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु; 'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.  रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

Updated: Apr 20, 2024, 12:01 AM IST
कल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु;  'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग title=

Ravindra Chavan :   कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याचा भाजप आणि शिंदे गटातील तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपचा अजूनही या जागेवर दावा कायम आहे. अशात या मतदासंघात भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर 'मोदी मॅजिक' नावाची रील सीरिज लाँच केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या रील सिरिजच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.

या रिल सीरिजमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेस सरकारने 2014 पूर्वी केलेली विकासकामे आणि मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत केलेल्या विकासकामांची तुलना केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पेयजल योजना आणि मेक इन इंडिया सारख्या भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर या रील्समध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय शहरी विकास, वीज, डेअरी, खादी ब्रँडिंग, निरोगी भारत अशा मोदी केंद्रित प्रकल्पांचे ब्रॅण्डिंग मंत्री चव्हाण करत आहेत.

रवींद्र चव्हाण हे शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. कोकणासह कल्याण डोंबिवली मतदासंघात त्यांची चांगली पकड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून ते सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. रवींद्र चव्हाण यांचा या भागातील जनसंपर्क आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद याच्या जोरावर भाजप कल्याणच्या जागेवर दावा करत आहे. 

चव्हाण 'सोशल मीडिया इन्फ्लुएंसर'च्या शैलीत महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएची व्होट बँक मजबूत करण्यात गुंतले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मोदी मॅजिक मालिका ज्या प्रकारे जनतेला आवडत आहे, त्यावरून यंदा महाराष्ट्रात कमळ अधिक जोरात फुलणार असल्याचा दावा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.