रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत. 

विशाल करोळे | Updated: Sep 21, 2023, 08:35 PM IST
रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : छत्रपत संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) एका 33 वर्षीय महिलेवर उपचार सुरू आहे, या महिलेला  ताप आला होता उलट्या झाल्या होत्या. निदानात कावीळ (Jaundice) झाल्याचं पुढं आलं. ही महिला एका ठिकाणी काविळीची औषध घ्यायला गेली तिच्या नाकात काही ड्रॉप टाकण्यात आले आणि तिला काही पुड्या खायला देण्यात आल्या यामुळे  या महिलेच्या किडनीवर (Kidney) गंभीर परिणाम झाले आणि आता आठवड्यातनं दोन वेळा या महिलेला डायलिसिस करायची वेळ आलेली आहे. हे सगळं झालंय त्या नाकात टाकायच्या औषधामुळं.. 

ही कहाणी फक्त या एकट्या महिलेची नाही तर याच रुग्णालयात एक 28 वर्षीय तरुण एका मठामध्ये उपचारासाठी गेला तिथला सहा महिने काढा पिला आणि त्यामुळे त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि आता आठवड्यातनं तीन वेळा डायलिसिस करतोय , तर एका रुग्णाला किडनीचा आजार होता त्याने एका गावठी डॉक्टरचा औषध घेतलं आणि आता त्याच्याही किडन्या निकामी झालेल्या आहेत. बोगस बुवा बाबा आणि गावठी डॉक्टर मुळे या रुग्णांवर अशी ही वेळ आली आहे.

सध्या या रुग्णालयात अशा पद्धतीने बोगस उपचार झालेले आठवर  रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या किडन्या निकामी झाल्यात. तर महिन्याला दहा ते पंधरा तर वर्षाला असे शंभर वर रुग्ण रुग्णालयात येत आहे. ही झाली एका हॉस्पिटलची कहाणी अशा अनेक हॉस्पिटलमध्ये असे कित्येक रुग्ण येत असतील त्याची गणनाच नाही त्यामुळे योग्य औषधोपचार घ्या असं आवाहन डॉक्टरांनी केलंय.

सध्या गावागावात गावठी औषधं देणारे दुकानदार पाहायला मिळतात. गुण येईल या आशेनं लोक त्यांच्याकडे जातात. मात्र संभाजीनगरमधील हा प्रकार पाहिल्यानंतर रोगापेक्षा इलाज भयंकर असंच म्हणण्याची वेळ आलीय. त्यामुळे तुम्ही अशा गावठी औषधांच्या किंवा बाबा-बुवांच्या आहारी जाऊ नका. नाहीतर तुमचीही किडनी निकामी होऊ शकते. 

किडनी खराब होण्याची लक्षणं
- पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला असहनीय दुखत असल्यास त्याकडे गंभीरपणे लक्ष द्या. हा किडनीच्या त्रासाचा संकेत असू शकतो.

- किडनी खराब झाल्यावर शरीरात हानिकारक पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे हाता-पायाला सूज येऊ लागते. त्याचबरोबर लघवीचा रंग देखील डार्क होऊ लागतो. हा रंगातील बदल किडनी समस्येचे लक्षण आहे.

- लघवी करताना रक्त पडल्यास याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. तात्काळ युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

- अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत.

- लघवी आल्यासारखे वाटते, मात्र होत नाही. असा अनुभव आल्यास हा किडनी खराब होण्याचा संकेत आहे.

- लघवी करताना जळजळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हा युरीन इन्फेक्शनचा संकेत आहे किंवा किडनीची काहीतरी समस्या आहे. यासाठी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- लहान सहान कामे केल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हा हार्मोन्सचे असंतुलन किंवा किडनी फेलचे लक्षण आहे.