मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले.

Updated: May 10, 2024, 12:21 PM IST
मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष title=

Dr. Narendra Dabholkar Murder Case Final Verdict : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. 

दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा 

पुणे सत्र न्यायलयाकडून याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवला होता. यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यात दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झालं आहे. त्या दोघांनाही सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तीन जणांची निर्दोष मुक्तता

तर विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यासोबतच पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्याने त्यांना न्यायलयाने निर्दोष ठरवलं आहे. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी या प्रकरणाचा संपूर्ण निकाल जाहीर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी 7.15 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत, तर दुसरी डोक्यात लागली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली होती. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला होता. त्यानंतर याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला होता. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर होते. अखेर आज तब्बल 11 वर्षांनी कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले आहे. तर विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.