वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 23, 2024, 11:48 AM IST
 वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश title=
forest department succeeded to captured the leopard in Vasai Fort after 25 days

Vasai Fort Leopard: वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश आले आहे. अखेर 25 दिवसांनंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. त्यामुळं भीतीच्या छायेत वावरणाऱ्या वसईकरांनी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे. 

25 दिवसांपूर्वी वसई किल्ल्या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यामुळं परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ट्रॅप बसवले होते. मात्र, तरीही बिबट्याला पकडण्यात यश येत नव्हते. त्यामुळं नागरिकही हैराण झाले होते. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं अवाहनदेखील करण्यात आलं होतं. तसंच, किल्ल्यातील प्रमुख रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला होता. 

बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ला परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र रो-रो फेरी आणि नागरिकांची वर्दळ यामुळं बिबट्या पकडण्यास अडचणी येत होत्या. बिबट्या बाहेर पडण्याच्या वेळीसच वर्दळ असल्याने बिबट्या किल्ल्याबाहेर पडत नव्हता. त्यामुळं वनविभागाने रो-रो फेरीच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द कराव्यात अशी मागणीही केली होती. वनविभागाच्या विनंतीनुसार, शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. 

वनविभागाने या सगळ्या प्रयत्नांअखेर 23 एप्रिल रोजी पहाटे 2च्या सुमारास वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वन विभाग आणि वाईल्ड वाल्डन या सामाजिक संस्थेने संयुक्त कारवाही करून बिबट्या जेरबंद केला आहे. मागच्या 25 दिवसापासून बिबट्या ने वसई किल्ल्यात आपला तळ ठोकला होता. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. मात्र, किल्ला परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. 

वन विभागाने पूर्ण किल्ला परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. तसेच किल्ल्यातील भुयार यावर पाळत ठेवली होती. शेवटी एका भुयारात बिबट्या असल्याचे निष्पन्न होताच त्याठिकाणी सापळा लावून त्याला सुखरूप पकडण्यात यश आले आहे. वन विभागाच्या पिंजऱ्यात त्याला जेरबंद करून रात्रीच वन विभाग घेऊन गेले आहेत. आता बिबट्याची वैद्यकीय चाचणी करुन तो सुखरुप असल्याची निष्पन्न होताच त्याला जंगलात सोडून देण्यात येईल. 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुंगारेश्वर अभयारण्यातून हा बिबट्या वसई किल्ला परिसरात आला होता. आता बिबट्या जेरबंद करण्यात आल्यानंतर वसई किल्ल्याच्या परिसरातील किल्ला बंदर, पाचूबंदर भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.