महाराष्ट्रातील 'या' गावात ब्रह्मचारी मारुतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना; ब्रिटिशकालीन परंपरा कायम

Hanuman Jayanti 2024: देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील एक गाव आहे जिथे आगळ्या वेगळ्या स्वरुपात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 23, 2024, 11:22 AM IST
महाराष्ट्रातील 'या' गावात ब्रह्मचारी मारुतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना; ब्रिटिशकालीन परंपरा कायम title=
Hanuman Jayanti 2024 Women have the honor of pulling the Hanuman Rath in these village of maharashtra

कुणाल जमदाडे, झी मीडिया

Hanuman Jayanti 2024: देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी जन्मोत्सवानिमित्त पालख्या निघत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील या शहरात ब्रह्मचारी असलेल्या मारुतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. ब्रिटिश काळापासून ही परंपरा पाळली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ही प्रथा पाळली जाते. ब्रिटीश काळापासून ही परंपरा संगमनेरकर जोपासतायत. आजही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होत आहे. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथा मिरवणुकीची बंदी झुगारून शेकडो महिलांनी १९२९ साली रथ ओढत ब्रिटीशांना आव्हान दिले होते.या रथयात्रे दरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यानंतर रथ ओढला जातो.

शेकडो महिलांची होते गर्दी

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर साज-या होणा-या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे . या ठिकाणी निघणा-या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळविण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी याठिकाणी गर्दी करतात. महिलांना या ठिकाणी मिळणा-या मानाला ब्रिटीश कालीन इतिहास आहे.

काय आहे इतिहास?

ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल, १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहुन नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २००-२५० स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला आणि ही बातमी समजताच स्त्रियांची संख्या २०० वरुन ५०० वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण या आदिशक्ती स्वरुप भारतीय नारी डगमगल्या नाहीत. आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला. 

महिलांच्या हाती रथाचा दोर

पोलिसांसोबत झटापटी सुरू असताना याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे व इतर मुली, स्त्रीयांनी रथावर चढून भगवान हनुमानाची प्रतिमा ठेऊन "बलभीम हनुमान की जय"चा दणदणीत गजर देऊन कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली. महिलांनी रथ ओढण्याची परंपरा आजही कायम ठेवली असून या रथयात्रेत शेकडो महिला सहभाग घेत आहेत. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉग्रेस तालुकाध्यक्षा जयश्री थोरात यांनीही रथ यात्रेत सहभाग नोंदवला आहे.