Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये 4 आणि 5 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 4, 2024, 06:59 AM IST
Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊस title=

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही परिस्थिती अशीच काहीशी दिसून येतेय. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजही मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये 4 आणि 5 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात कशी असणार परिस्थिती?

पुढचे 3 दिवस म्हणजे 5 मे पर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात हवामान कोरडं आणि उष्ण असण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये 4 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 व 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. अधिकतर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4 आणि 5 मे रोजी म्हणजे आजच्या दिवशी आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील सांगली तसंच सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 4 व 5 तारखेला लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोला, चंद्रपूर, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईतील चेंबूर तसंच पवई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी तापमान 37 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.