Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...   

सायली पाटील | Updated: Apr 25, 2024, 10:05 AM IST
Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द? title=
Indian railway vande bharat and tejas express on konkan track cancelled latest updates

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही रेल्वे पोहोचली असून, डोंगररांगा म्हणू नका किंवा विस्तीर्ण नद्या म्हणू नका, ही रेल्वे अतिशय दिमाखात निर्धारित मार्गावरून पुढे जात अपेक्षित ठिकाणांवर पोहोचत असते. अशा या रेल्वे विभागाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच निसर्यसौंदर्यानं नटलेला मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर, या रेल्वे मार्गावर एकाहून एक सरस दृश्य़ आणि निसर्गानं मुक्तहस्तानं केलेली उधळण पाहायला मिळते. 

कोकण रेल्वे मार्गावरील हा प्रवास वंदे भारत आणि तेजस यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या वेगवान रेल्वेगाड्यांमुळं तितकाच खास ठरतो. कमीत कमी वेळात मोठं अंतर ओलांडण्याची मुभा देणाऱ्या या रेल्वे गाड्यांना प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला असला तरीही येत्या काळात मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. (Vande Bharat And Tejas Express on konkan Route)

IRCTC च्या संकेतस्थळावरील 'तो' मेसेज 

(Central Railway) मध्य आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनामध्ये असणाऱ्या ताळमेळाअभावी राज्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत धावणार की नाही, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे आयआरसीटीच्या संकेतस्थळावरील एक मेसेज. 

जवळपास मागील दोन महिन्यांपासून IRCTC च्या संकेतस्थळावर कोकण रेल्वे मार्गावरील 10 जून नंतरची वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचा मेसेज दाखवला जात आहे, ज्यामुळं या दोन अतीव महत्त्वाच्या आणि प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असणाऱ्या रेल्वे पावसाळ्यात धावणार नसल्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. 

हेसुद्धा वाचा : वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

दरवर्षी पावसाळ्यादरम्यान, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत कोकण रेल्वेच्या वतीनं पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येतं. 10 जून ते 31 ऑक्टोबरदरम्यानच्या काळात हे वेळापत्रक लागू असतं. पण, रेल्वेच्या 120 दिवस आधी आरक्षणाच्या नियमामुळं एव्हाना रेल्वेच्या वेळापत्रकात आगामी बदल दिसण्यास सुरुवात होणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात मात्र असे कोणतेही बदल दिसत नसल्यामुळं आता प्रवाशांना जून ते ऑगस्टदरम्यानची तिकीट आरक्षणंही करता येत नाहीयेत. 

सद्यस्थिती आणि वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस या ट्रेन रद्द होणाऱ्या चर्चा पाहता अद्याप कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्र न मिळाल्यामुळं येत्या दिवसांतील बदल नमूद केले नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली. तेव्हा आता रेल्वे विभागत नवी माहिती नेमकी कधी प्रसिद्ध करणार की खरंच या दोन रेल्वे पावसाळ्यात रद्द असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.