सोशल मिडियावर फेमस असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा ठरतोय जीवघेणा; तरुणाचा मृत्यू

जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 17, 2024, 07:54 PM IST
 सोशल मिडियावर फेमस असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा ठरतोय जीवघेणा; तरुणाचा मृत्यू   title=

Kalmandavi Waterfall : सध्या सोशल मिडियावर ट्रेंडमध्ये असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा जीवघेणा ठरत असल्याचे दिसत आहे.   जव्हारच्या काळमांडवी धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. येथे  पोहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आगे. नाशिक मधून आपल्या सात मित्रांसह हा तरुण काळमांडवी धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. 

हर्षल जितेंद्र बागुल वय वर्ष 22 असे मृत तरुणाचे नाव आहे. जव्हार तालुक्यातील काळमांडवी येथील धबधब्यावर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. धबधब्याचा डोह असलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने युवकाचा डोहात बुडून मृत्यू झाला आहे. या मृतदेह शोधण्यात स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना यश आले आहे. 

नेमका कुठे आहे हे सोशल मिडियावर व्हायरल झालेला धबधबा

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधबा आहे.  जव्हार शहरापासून अवघ्या 8 किमी अंतरावर हा धबधबा आहे. केळीचा पाडा या गावातून धबधब्याजवळ जाता येते.  पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात तसेच देशभरातून अनेक ठिकाणचे पर्यटक येतात. मात्र, आता हा धबधबा उन्हाळी धबधबा म्हणून प्रसिद्ध झाला आहे.  एका डोहात हा धबधबा कोसळत आहे. या डोहात सूर मारण्याच्या थरार अनुभवण्यासाठी ट्रेकर्स मंडळी या धबधब्याला आवर्जून भेट देत आहेत. 

हा धबधबा अतिशय सुंदर आहे. तितकाच हा धबधबा धोकादायक देखील आहे. कारण याचा डोह अतिशय खोल आहे.  जवळपास सर्व धबधबे पावसाळा असेपर्यंतच प्रवाहित असतात. मात्र,  पावसाळा जाऊन हिवाळा संपून वसंत ऋतुची चाहुल लागली तरी हा धबधबा प्रवाहित आहे.  मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा धबधबा  SUMMER WATERFALL म्हणून सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे.  जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे.  हा धबधबा 100 मी. खोल आहे. विशेष म्हणजे हा धबधबा वर्षभर कोसळतो.   ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी अनेक पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देतात.  मुंबईच्या अगदी जवळ असलेला हा हिडन वॉटरफॉल अर्थात डोंगरकपारीत लपलेला धबधबा ट्रेकर्सना आकर्षित करत आहे.