ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख

Uddhav Thackeray Group On Navneet Rana: मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 18, 2024, 08:48 AM IST
ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख title=
पंतप्रधा मोदींवर साधला निशाणा

Uddhav Thackeray Group On Navneet Rana: अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नवनीत राणा यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नवनीत राणा यांनी नंतर या विधानावरुन घुमजाव केलं असलं तरी याच मुद्द्यावरुन आता ठाकरे गटाने मोदींची हवा नाहीच तरीही ‘सर्व्हे’ची हवा का? असा सवाल आता भाजपाला केला आहे.

कृत्रिम पाऊस पाडला जातो तसे...

"अमरावतीच्या मावळत्या खासदार नवनीतबाई राणा यांचे वागणे-बोलणे सर्वच खोटे असते. त्यांचे अश्रू, त्यांचे हसणे, त्यांचे बोलणे, त्यांचे जात प्रमाणपत्र व त्यांचे हिंदुत्व प्रेम वगैरे सगळेच बेगडी व खोटे आहे; पण अमरावतीच्या ताई-बाईंनी एक जळजळीत सत्य आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे ते म्हणजे, ‘‘मोदींची हवा आहे या भ्रमात अजिबात राहू नका. मोदींची हवा-लाट-वावटळ वगैरे काहीच नसून आता आपल्यालाच लढून जिंकावे लागेल.’’ अमरावतीच्या ताई-बाईंनी हे असे उकळते सत्य सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मोदींची हवा 2014-2019 सालीही नव्हती. जसा कृत्रिम पाऊस पाडला जातो तसे ‘हवा हवा’ असे वातावरण निर्माण केले जाते," असा टोला ठाकरे गटाने 'सामना'मधून लगावला आहे.

400 वर खासदार निवडून आले तर इंडिया गेटवर बसवू

"लोकांना भ्रमात ठेवून, मूर्ख बनवून निवडणुका लढवणे हे ‘हवा’ असल्याचे लक्षण नाही. मोदींचा विजय हा असत्य व अधर्माच्या हवेवर मिळविलेला असतो. मोदी व त्यांच्या लोकांनी या वेळी ‘चारशे पार’ची हवा निर्माण केली. खरे तर त्यांनी ‘आठशे पार’ वगैरेचेच ढोल वाजवायला हवेत. नव्या संसदेत त्यांच्या खासदारांना बसायला जागा कमी पडली तर चारशेच्या वरचे निवडून आलेले खासदार इंडिया गेटवर बसवू, असे जाहीर करायला हरकत नव्हती. हवा ही अशीच बनत असते," असा उपहासात्मक टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

मुंबईतल्या जागा बेइमान गटास मिळणार?

"महाराष्ट्रात फडणवीस वगैरे त्यांचे लोक बिनधास्तपणे सांगतात, राज्यात आम्ही 45 पेक्षा जास्त जिंकू. भाजपवाले तोंडास येईल तो आकडा लावीत आहेत व लोक त्या आकड्यांची मजा घेत आहेत. ‘सर्व्हे’च्या माध्यमातून हे लोक हवाबाजी करीत आहेत. गोदी मीडिया म्हणून कुख्यात ठरलेल्या कंपन्या ‘पोल’ कंपन्यांना हाताशी धरून मोदी यांना मान्य होतील असे आकडे सर्व्हेतून समोर आणत आहेत. लोकांना भ्रमित करण्याचा हा प्रकार आहे. मुंबईत म्हणे शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही. मग मुंबईतल्या जागा बिनविरोध भाजप व त्यांच्या सोबत असलेल्या बेइमान गटास मिळणार आहेत का?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

नक्की वाचा >> 'कचा-कच बटण दाबा'बद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या..'

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

"भाजप व त्यांच्या लोकांचे अद्यापि उमेदवार ठरत नाहीत. मिंधे-अजित पवारांच्या गटाचे उमेदवार भाजपनेच कापले. त्यामुळे लोकांत त्यांचे नाकच कापले गेले. जेथे उमेदवार ठरले नाहीत किंवा उमेदवारच मिळत नाहीत त्या जागाही हे सर्व्हेवाले भाजप व त्यांच्या गटांना सरळ देऊन टाकतात हे आश्चर्यच म्हणायला हवे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या वेळी त्यांना ईव्हीएमही वाचवणार नाही. त्यामुळे ‘एक अकेला सब पर भारी’ ही वल्गनाच ठरणार आहे," असं भाकित ठाकरे गटाने केलं आहे.

रावण संस्कृतीची हवा कशी निर्माण होईल?

"काल रामनवमी साजरी झाली. भाजपवाल्यांनी जागोजाग रामाच्या नावाने मतदारांना सुंठ-खोबरे वाटले, अयोध्येचे देखावे उभे केले तरी भाजपची हवा झाली नाही. रामाच्या स्वागतासाठी फुले, रांगोळ्या आणि शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे ठोकणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जनता उभी ठाकली आहे. रामाचे मंदिर फक्त आपल्यामुळेच उभे राहिले अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदीभक्तांनी केला. मोदी हेच दंडकारण्यात गेले व वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदींची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही. प्रभू श्रीरामाने त्यांच्या जीवनचरित्रात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे तो भाजपवाले विसरले. तो संदेश म्हणजे, असत्यावर उभारलेला डोलारा कोसळल्याशिवाय राहत नाही आणि सत्य कितीही खोलवर पुरले तरी प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याग करावा लागतो. राम वनवासात गेला नसता तर रामायण घडले नसते. रामाने रावणाचा पराभव केला. राम-रावण युद्ध सत्य व धर्मरक्षणासाठी झाले. राम हे एकवचनी होते. दिलेला शब्द पाळणारे मर्यादापुरुषोत्तम होते. रावणाने सीतेचे अपहरण केले म्हणजे हिंदू अस्मितेचेच अपहरण केले. आजच्या रावणांनी देशाची अस्मिता, स्वाभिमान, लोकशाहीरूपी सीतेचे अपहरण केले. अशा रावण संस्कृतीची हवा आपल्या देशात कशी निर्माण होईल?" असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

नक्की वाचा >> 'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

भाजपचा जनाधार म्हणजे वाळूचा किल्ला

"बजरंगाने लंकाच जाळली ती रावणाची व आज जनतारूपी बजरंग हुकूमशाहीची लंका जाळायला सज्ज झाला आहे. रावणाचा अहंकार हेच त्याच्या पराभवाचे कारण ठरले. चौदा चौकड्यांचे त्याचे राज्य त्यामुळे रामाकडून खतम झाले. संपूर्ण देशातच आजचे वातावरण व हवा हुकूमशाही आणि ढोंगाविरुद्ध आहे. रावण निदान विद्वान तरी होता. आजचे रावण हे शतमूर्ख आहेत. म्हणूनच नवनीत राणा यांनी नकळत सांगितलेले सत्य महत्त्वाचे ठरते. मोदींची हवा नाहीच. समाजमाध्यमांवर मोदीविरोधी संदेशांचा भडीमार सुरू आहे आणि मोदींचे भगतगण या भडीमारामुळे हवालदिल झाले आहेत. हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, राममंदिर यापलीकडे भगतगणांची धाव नाही. समाजमाध्यमांवर जो मोदींची बाजू घेईल त्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातले अर्धशिक्षित लोकदेखील मोदींच्या खोटेपणावर आणि 'इलेक्टोरल बाँडस्'वर बोलत आहेत. वाढत्या महागाईमुळे महिला वर्गाची बोंबाबोंब सुरू आहे. भाजपचा जनाधार म्हणजे वाळूचा किल्ला होता. तो कोसळला आहे," असं अग्रलेखात म्हटलं आहे.

... तरी मोदी व त्यांचे लोक उडून जातील

"‘वॉर रुकवा दी पापा’ या मोदीकृत जाहिरातबाजीची चेष्टाच सुरू आहे. लोक मोदी व त्यांच्या लोकांना हसत आहेत. मागची दहा वर्षे गंडवागंडवी करणारे देशातील जनतेला तिसऱ्यांदा गंडविण्यात अपयशी ठरत आहेत. ही निवडणूक मोदी व त्यांच्या लोकांच्या हातात राहिलेली नसून लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे ‘चारशे पार’चा जुमला म्हणजेही वेडेपणाच आहे. गुजरात, राजस्थान वगैरे भागात संपूर्ण राजपूत समाज मोदींच्या अंगावर आला, पण राजपुतांचे मोदींविरोधी उग्र आंदोलन एकही मीडिया दाखवत नाही. तोच मीडिया बोगस सर्व्हे करून मोदी विजयी होत असल्याचे सांगतो, हे गमतीचे आहे. मोदींची हवा नाही व आता कृत्रिम हवादेखील निर्माण होणार नाही. तरीही ‘सर्व्हे’ची हवा का केली जात आहे? भाजपचे सर्वच मुखवटे गळून पडले आहेत. त्यामुळे मोदींची हवा नाही हे जे अमरावतीच्या ताई-बाईंनी सांगितले ते खरेच आहे. जनतेनेदेखील आता इतके उग्र रूप धारण केले आहे की, लोकांनी फुंकर मारली तरी मोदी व त्यांचे लोक उडून जातील," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.