ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.

कपिल राऊत | Updated: Apr 26, 2024, 04:55 PM IST
ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय? title=

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबबातचा व्हिडिओ ट्विट केलाय.  ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील (Dadoji Kondadev Stadium) रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. या बंद खोलीमध्ये बंद लिफाफे ,मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम (EVM) सापडले. त्यानंतर या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढण्यात आलेत.

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये जिण्याखालील एक खोलीत ईव्हीएम मशीन सापडल्या. मतदानासाठी जितक्या मशीन वापरल्या जातात, मतदान संपल्यानंतर त्या मशीनची मोजदाद करुन निवडणुक अधिकाऱ्याच्या हातात सोपवाव्या लागतात. मग ठाण्यात सापडलेल्या ईव्हीएम मशीन आल्या कुठून, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएमचा घोटाळा होत, ईव्हीएम बदलले जातात ही मनात साशंकत आहे. मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे. बॅलेट पेपरने मतदान झाल्यास आपल्या देशाची लोकसंख्या पाहात मतमोजणीला चार दिवस लागतील, पण मनात संशय राहाणार नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही काहीच फायदा नाही. मला बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्यानतंरही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला नाही, म्हणजे यांना किती गांभीर्य आहे बघा असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला तर सर्व जण सलमान खानला त्याच्या घरी जाऊन भेटून आले. त्याच्यासोबत फोटो काढले असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमचा गोंधळ
दुसऱ्या टप्प्यातील मतदानात EVM मध्ये बिघाडाच्या अनेक घटना महाराष्ट्रात दिसून आल्या. अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. अमरावतीत रुक्मिणी नगर शाळा इथल्या 19 नंबरच्या मनपा शाळेतील एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती..

तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 39 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे 39 ठिकाणी मशिन्स बदलण्यात आली. 16 कंट्रोल युनिट्सही बदलण्यात आले. 25 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या. नांदेडच्या मौजे टाकळी येथील मतादन केंद्रातील बिघाड दुरुस्त झालाय.. EVMमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल दीड तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती.. मशीन बंद पडल्याने मतदानासाठी आलेले मतदार ताटकळत उभे होते. दीड तासानंतर या ठिकाणी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम सात वाजल्यापासून बंद पडलं होतं. 

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निप्पानी सावरगावात ईव्हीएममध्ये झालेला बिघाड दूर करण्यात यश आलं. मतदान प्रक्रिया सुरू करण्यासाठी ईव्हीएम मशीन सुरू करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, मशीन सुरूच झालं नाही. जवळपास दीड तासांपासून मशीन बंद पडली होती. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबली. अखेर ईव्हीएम सुरू झाल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.