'गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण...' पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले?

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी डागली तोफ. अंबादास दानवे पार्थ पवार यांच्याविषयीची माहिती ऐकताच काय म्हणाले पाहिलं?   

सायली पाटील | Updated: Apr 23, 2024, 12:25 PM IST
'गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण...' पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले?  title=
loksabha election 2024 mva leader ambadas danve slams govt decision of giving y + security to ncp parth pawar

Loksabha Election 2024 : या देशात हुकूमशाही येण्याची शक्यता आहे, असं म्हणताना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि महाविकासआघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करत सूरतमध्ये बिनविरोध निवडणून आलेल्या भाजप उमेदवाराच्या विजयाचा दाखला त्यांनी यावेळी दिला. 

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना y + सुरक्षा मिळण्यासंदर्बातील प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी तीव्र नाराजीचा सूर आळवला. पार्थ पवार यांचं नाव न घेता दानवे यांनी या निर्णयाचा विरोध केला. 

'हे 30- 40 आमदार यांना कुत्रंही विचारात नाही त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा द्या मात्र शान म्हणून नकोच...', अशा शब्दांत दानवे या प्रश्नावर व्यक्त झाले. 'ही असली सुरक्षा काढून घेतली पाहिजे', असंही ते यावेळी म्हणाले. 

मंगळवारीच पार्थ पवार यांच्या सुरक्षा वाढीसंदर्भातील आदेश शासनाकडून पारित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडालेली असताना पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. 

हेसुद्धा वाचा : मजाच मजा! मे महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना 'इतके' दिवस सुट्टी

 

कोणाला मिळते Y प्लस सुरक्षा? 

अति महत्त्वाच्या व्यक्तीला किंवा महत्वाच्या व्यक्तीला Y प्लस सुरक्षा दिली जाते. विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या व्यक्तीलाही Y प्लस सुरक्षा दिली जाते. या सुरक्षा कवचामध्ये 11 सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो. त्यात 2 ते 4 शस्त्र किंवा बंदूकधारी सुरक्षा रक्षक, सीआरपीएफ किंवा CISF जवान असतात. 

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना फक्त पार्थ पवारच नव्हे, तर पंतप्रधान मोदी आणि इतर विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भातही त्यांनी सूचक वक्तव्य केलं. मोदी जी स्वतः धार्मिक उन्माद करतायत आणि निवडणूक आयोगाला आमचा 'जय भवानी'चा नारा खुपतोय, आता आयोगच भाजपचे बटीक झाले की काय असा प्रश्न पडतोय अशा शब्दांत त्यांनी टीकेचा सूर आळवला.