'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीबरोबर मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरु होती. मात्र आज त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्यावर टीका होईल याची कल्पना असल्याचंही ते म्हणाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 27, 2024, 12:38 PM IST
'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..' title=
पत्रकार परिषदेत केला खुलासा

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समावून घेण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी रात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच वंचित घटकातील उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच चर्चा नेमकी काय फिस्कटली यावरही भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीबरोबर नेमकं काय बिनसलं?

महाविकास आघाडीबरोब फिस्कटलेल्या बोलणीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी सविस्तर माहिती दिली. "नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत. त्यावेळेस आम्ही जरांगे पाटील फॅक्टरकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही, असं सांगितलं. पण ते (महाविकास आघाडीमधील घटकपक्ष) हे मान्य करायला तयार नव्हते. परिवारवाद वाचवायला त्यांच्याकडून वंचितचा वापर करायचा होता. आम्ही ते नाकारलं," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमच्यावर टीका होईल पण...

तसेच महाविकास आघाडीबरोबर न लढल्याने आमच्यावर टीका होईल याचा अंदाज असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. "या निर्णयानंतर आमच्यावर टीका होईल याची कल्पना आहे. पण मी जितकी लोकांची नस ओळखतो त्याप्रमाणे सामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे. ते परिवर्तन यासाठी हवं आहे की एमएसपीवर कायदा तयार झाला पाहिजे. शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. रोजगार आणि ग्रामीण उद्योजक यातून निर्माण होतील. यावर सकारात्मक चर्चा झाली," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नव्या राजकारणाची सुरुवात

"जरांगे पाटील आणि त्यांच्या संघटनेबरोबरचं आमचं एकमत झालं आहे. त्यांना कोणताही पक्ष स्थापन करायचा नाहीये. सामाजिक बदलासाठी लोक ही युती स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. आम्ही असं समजून चाललो आहोत की या करारामधून नव्या राजकारणाला सुरुवात होईल. नितिमत्ता, मूल्य आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या राजकारणाची ही सुरुवात असेल," असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> स्वतंत्र लढणार म्हणत आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर; येथे क्लिक करुन वाचा संपूर्ण यादी

70 वर्षांमध्ये ओबीसी प्रतिनिधी दिले नाहीत

मनोज जरांगे पाटलांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आमचं एकमत झाल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. "शेतकरी, बेरोजगारांचा प्रश्न, शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय कसे उभारता येतील याची चर्चा झाली. या सर्व प्रश्नांमध्ये ओबीसी समाजाचे लोकसभेत एक किंवा दोन व्यक्ती सोडल्यास गेल्या 70 वर्षात प्रतिनिधी दिलेले नाहीत. त्यामुळे या वेळेस ओबीसी, भटके-विमुक्त फॅक्टर लक्षात घेत या समाजातून उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणायचं निश्चित झालं," अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.