सदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यादरम्यान सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2024, 02:17 PM IST
सदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...' title=

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना (Ajit Pawar)  देत नाहीत असंही यावेळी ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातले (Madha Lok Sabha Election)  महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 

"ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे.  या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक चर्चा आहेत. काय तर म्हणे साहेबांचं वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा सुरू आहेत. आता साहेबाला काय काम आहे? त्यांना म्हसरं राखायची आहेत? की जनावारांना पाणी पाजायचं आहे? तोच धंदाच करायचा आहे. पण त्यांना मानलं पाहिजे. या वयातही ते आमच्या सारख्यांना संधी देत नाहीत," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

"बाप मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच  देतो आणि गप्प बसतो.  पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडत आहे. अजित पवार किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आलं की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतंय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही.  कारण आता हे बास झालं आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच  म्हातारा झाल्यावर करायचा का?  म्हणून अजितपवार मोठ्या ताकजीने विकासासाठी महायुतीमध्ये आले," असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. 

याआधी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला असं विधान केलं होतं. “70 वर्षांपासून महाराष्ट्रात मूठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात तुम्हाला कुणी हुंगलंही नसतं. मात्र देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं आहे,” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.