उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 25, 2024, 09:17 PM IST
उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती title=

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल. 

राज्यातील आठ मतदार संघ
विदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होतेय.

अमरावती मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष आहे. कारण आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि विद्यमान खासदार नवनीत राणांमुळे (Navneet Rana). भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांसमोर बच्चू कडूंनी आव्हान उभं केलंय. तर आनंदराज आंबेडकरांमुळे अमरावतीची लढत चौरंगी होतेय. भाजपकडून नवनीत राणा रिंगणात आहेत. तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याबरोबरच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत.. आनंदराज आंबेडकर अपक्ष म्हणून लढत असून त्यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

बुलढाणामध्ये दोन शिवसेनेमध्येच मुख्य लढत होतेय. मात्र रविकांत तुपकरांच्या उमेदवारीमुळे बुलढाण्यात चुरस वाढलीय. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात सामना होणार आहे. तर कुणबी समाजातून आलेले आणि वंचितचे उमेदवार प्रा. राजेंद्र साळुंखे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुखांमध्ये लढत होतेय. मात्र बंजारा पाड्यावर प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अनिल राठोड यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

परभणीत मराठवाड्यातले प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यामुळे चुरस वाढलीय. परभणीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत. शेतकरी वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना वंचितने उमेदवारी दिलीय..

हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराम कदम कोहळीकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर रिंगणात आहेत. तर वंजारा समाजातले डॉ. बी.डी.चव्हाण यांना वंचितने उमेदवारी दिलीय. चव्हाण यांनी निवडणुकीत दीड लाखांच्या आसपास मतं घेतली होती.. 

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. अशोक चव्हाणांनी काहीच महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हातात घेतलंय. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती. यावरुनच नांदेडची लढत किती प्रतिष्ठेची आहे हे लक्षात येतंय..