100 टक्के मिळण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो? बारावी टॉपर तनिशाने सांगितलं गुपित

12th Topper Tanisha Bormanikar: तनिशाने कसा अभ्यास केला? अभ्यासाला किती तास दिले? याची माहिती झी 24 तास ला तिने दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: May 21, 2024, 04:02 PM IST
100 टक्के मिळण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो? बारावी टॉपर तनिशाने सांगितलं गुपित title=
HSC Topper Tanisha Bormanikar

12th Topper Tanisha Bormanikar: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यात छत्रपती संभाजी नगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली आली आहे. तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान तनिशाने कसा अभ्यास केला? अभ्यासाला किती तास दिले? याची माहिती झी 24 तास ला तिने दिली आहे. 

बारावीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी,  कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातील 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला. 

संभाजीनगरची तनिशा बोरमणीकर या विद्यार्थीनीला बारावीत शंभर टक्के गुण मिळाले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळवणारी तनिशा कॉमर्सची विद्यार्थीनी आहे. बारावीत शंभर टक्के निकाल लागेल असे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. 95 टक्के गुण मिळतील असं वाटल होतं पण शंभर टक्के गुण मिळतील असं वाटलं नव्हत. यामुळे खूप आनंदी असल्याचे तनिशा म्हणाली.  

शेवटचे 2 महिने अभ्यास

मी शेवटचे 2 महिने अभ्यास केला. माझ्या बुद्धीबळ स्पर्धा असायच्या. त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास करु शकले नव्हते. पण शेवटचे 2 महिने खूप अभ्यास केल्याचे तनिशाने सांगितले. बारावीच्या परीक्षेचे मी एवढं टेन्शन घेतलं नव्हतं. माझ्यावर घरच्यांचाही दबाव नव्हता. आज निकालाच्या दिवशी नर्व्हस होती. पण आता खूष असल्याचे तिने सांगितले. 

रोजचे किती तास अभ्यास?

दहावी, बारावीमध्ये टॉप करण्यासाठी तासनतास अभ्यास करावा लागतो असे म्हणतात. तू  कितीवेळ अभ्यास केलास असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मी दहा-बारा तास अभ्यास नाही केला, असे तिने सांगितले. मागच्या वर्षीचे पेपर सोडवत गेली. मॉक टेस्ट रोज सोडवत गेली. त्यामुळे माझा अभ्यास होत गेला. या दिवशी मला एखाद्या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचाय. मग कितीही वेळ लागूदे असा टार्गेट मी ठरवला होता, असे ती म्हणाली. 

कॉमर्स का घेतलं?

माझी दहावीची परीक्षा झाली तेव्हा मी बुद्धीबळात राष्ट्रीय चॅम्पियन झाले होते. त्यावेळी सायन्स मला घ्यायचे नव्हते आणि मला सायन्समध्ये आवड देखील नव्हती. 

भविष्यात काय बनायचंय?

भविष्यात मला सीए बनायचे आहे. मी फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतेय, असे तिने सांगितले.

निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे 

कोकण 97.51 %
लातूर  92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %

पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज? 

सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा  घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.