मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

 "मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती. 

Updated: Apr 25, 2024, 07:37 PM IST
मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...' title=

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच असतो असं आपण कायमच ऐकतो. आता मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. श्रीरंग बारणे यांनी मार्च 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते दहावीच्या राहिलेल्या दोन विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी स्वत: ही आनंदाची बातमी दिली आहे. 

श्रीरंग बारणे हे 60 वर्षांचे आहेत. त्यांनी मार्च 2022 मध्ये चिंचवडमधील श्री फत्तेचंद जैन विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांचे दोन विषय राहिले होते. आता ते त्या राहिलेल्या दोन विषयातही उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता पुढील शिक्षण निवडणुकीनंतर पूर्ण करणार असल्याचे सांगितले. 

त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली

माझ्यासारखे अनेक लोक वयाची मर्यादा न बाळगता शिक्षण घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच डॉक्टरेट मिळवली. राजकारणातील प्रत्येक माणूस ध्येयवादी असतो. त्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याची, जाणून घेण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे मीही शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण घेण्याबरोबरच मी चार पुस्तकांचे लिखाणही केले आहे. शब्दवेध, लढवय्या, मी अनुभवलेली संसद आणि माझा वैभवशाली मावळ अशी माझ्या चार पुस्तकांची नावे आहेत. ही चारही पुस्तके मी लिहिलेली आहेत. मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती. 

तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दलही त्यांनी भाष्य केले. यावेळी आपल्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी केलेल्या कामाच्या विश्वासावर जनता आपल्याला तिसऱ्यांदा संधी देईल, असा विश्वासही श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.  

श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती

श्रीरंग बारणे यांनी निवडणूक अर्जासह दिलेल्या शपथपत्रात त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे. यात त्यांनी कुटुंबाची एकूण संपत्ती 132 कोटी 23 लाख 91 हजार 631 रुपये असल्याचे नमूद केले आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 29 कोटी 42 लाख 81 हजार 497 रुपयांनी वाढ झाली आहे. 

बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन कार आहेत. त्यांच्याकडे हिऱ्याची 11 लाख 55 हजारांची एक अंगठी, तर 32 लाख 50 हजारांचे 470 ग्रॅम सोने आहे. तर 35 हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे. तसेच त्यांची पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख 50 हजारांच्या कर्णकुड्या, 51 लाखांचे 743 ग्रॅम सोने आहे. बारणे यांच्यावर 44 लाखांचे वाहन आणि वेगवेगवेळ्या संस्थांचे 41 लाख असे एकूण 85 लाखांचे कर्ज आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट लढत

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब गटाच्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे.