विदर्भातून थेट मुंबईत पोहोचा; समृद्धी महामार्गाचा होतोय विस्तार, 'या' जिल्ह्यांना फायदा

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Latest News: समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक दिलासा मिळणार आहे. लवकरच महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 13, 2024, 12:05 PM IST
विदर्भातून थेट मुंबईत पोहोचा; समृद्धी महामार्गाचा होतोय विस्तार, 'या' जिल्ह्यांना फायदा title=
mumbai to nagpur reach in 8 hrs Samruddhi Highway Expansion Project Receives Strong Response

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Latest News: मुंबई-नागपूर हा प्रवास समृद्धी महामार्गामुळं 8 तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. तर लवकरच समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्याचबरोबर एकीकडे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. या प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. या निवेदाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (Samruddhi Mahamarg Update)

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, चंद्रपूरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते चंद्रपूर, नागपुर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 46 निविदा दाखल झाल्या आहेत. एमएसआरडीसीने या महामार्गासाठी तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानंतर आठवड्याभरातच आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नियुक्ती होणार आहे.

महामार्गाचा उद्देश काय?

राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नागपूर ते चंद्रपूर असा 195 किमी लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. तर, नागपूर ते गोंदिया असा 162 किमी व भंडारा ते गडचिरोली असा 142 किमी लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. हे तिन्ही महामार्ग खुले झाल्यानंतर विदर्भातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. 

समृद्धी महामार्ग ऑगस्टपर्यंत सुरू होणार 

मुंबई- नागपुर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहेत. कसारा येथील उड्डाणपुलाचे काम वगळता उर्वरित काम जुलैअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळं ऑगस्टपासून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. कसारा येथील उड्डाणपुलाची एकच बाजू ऑगस्टपर्यंत तर दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र, डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवा थांबवता येणार नाही. त्यामुळं पुलाजी जी दुसरी बाजू आहे ती ऑगस्टपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. त्याबाजूने दुसरी वाहतूक सुरू करुन हा टप्पा खुला करता येऊ शकतो. एकदा का समृद्धी महामार्ग खुला झाला तर मुंबई ते नागपूर अंतर 8 तासांत पूर्ण होणार आहे.