नाशिकमध्ये ST बस आणि ट्रकचा भीषण अपघात! 4 प्रवाशांचा मृत्यू; 9 जण जखमी

Nashik Bus Accident: एसटी महामंडळाच्या बसच्या पुढील बाजूला डावा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जोरदार धक्का बसल्याने बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 30, 2024, 04:06 PM IST
नाशिकमध्ये ST बस आणि ट्रकचा भीषण अपघात! 4 प्रवाशांचा मृत्यू; 9 जण जखमी title=
बस अपघातामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू

Nashik Bus Accident News: मुंबई-आग्रा महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या मार्गावरील चांदवडमधील राहुड घाटामध्ये एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला असून या अपघातात 4 प्रवासी दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावहून ते वसईला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. या अपघातामध्ये 9 प्रवासी जखमी झाले आहेत.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली. राहुड घाट परिसरामध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. सारं काही इतक्या वेगाने घडलं की प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले किंवा बसच्या खिडक्यांवर आदळले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 प्रवासी दगावले आहेत.

प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. अनेक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं धक्कादायक चित्र या अपघातानंतर रस्त्यावर दिसत होतं. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांपैकी काहींनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्त बसच्या सांगाड्यावर चढून अडकलेल्या प्रवाशांना एक-एक करुन बाहेर काढलं. मतदकार्य पोहचण्याआधीच या प्रवाशांनी केलेल्या मदतीमुळे बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढता आलं. अपघातानंतर बस डिव्हाडरला आदळून थांबल्याचं घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट होत आहे. या अपघातात जखमी झालेल्या 17 प्रवाशांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

बस बाजूला काढण्याचं काम सुरु

या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारीही येणार असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात नेमका कसा घडला? यासाठी कोण कारणीभूत आहे याचा सखोल तपास केला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ही अपघातग्रस्त बस या मार्गावरुन बाजूला काढण्याचं कामही सुरु करण्यात आलं आहे. ही बस बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वव्रत होईल. सध्या या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस उपस्थित असून मदतकार्य सुरु आहे.