'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Apr 18, 2024, 05:00 PM IST
'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास title=
Pankaja Munde, Beed LokSabha

Beed LokSabha : बीड मतदारसंघातून यंदा भाजपकडून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे (Pankaja Munde Vs Bajrang Sonawane) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. 13 मे रोजी मतदान होणार असल्याने आता पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा वनवास सुरू होता. त्यानंतर आता पंकजांनी विजयाचा निश्चय केल्याचं पहायला मिळतंय. माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असं म्हणत पंकजांनी प्रचाराला जोर लावला आहे. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मला पण वनवास भोगायची तयारी ठेवावी लागली. मात्र, माझा वनवास संपलाय.. आता लवकरच राज्यभिषेक होणार, असा विजयाचा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्या बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम नवमी कार्यक्रमानिमित्त बोलत होत्या. दादेगाव येथे श्रीराम नवमी महोत्सव निमित्त भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. फुगडी खेळण्यांच्या आनंद ही लुटला. त्यानंतर त्यांनी बोलताना विश्वास व्यक्त केला आहे. तुम्ही गुलाल लावला आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, माझा वनवास संपला आणि लवकरच राज्यभिषेक होईल. रामला पण वनवास भोगावा लागला होता, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

माझ्या पराभवानंतर लोकांनी मला सन्मान दिला. माझ्या संघर्षातही लोकांनी मला सन्मान दिला आता ही लोक लोकसभा निवडणुकीत ही मला विजयी करतील, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी राजपुत्र नाही रयत पुत्र असं म्हणत काल रजनीताई पाटील यांनी बीडची निवडणूक ही राजपुत्र विरुद्ध रयत पुत्र होणार असल्याचं होतं. सत्य पटवून द्यायला परिश्रम करावे लागतात. आरक्षणाचा मुद्दा राज्यकर्त्यांनी व्यवस्थित हाताळन गरजेचं आहे, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, या निवडणुकीला जातीचा रंग जरी दिला गेला असला तरी समाजातील नागरिक योग्य निर्णय घेतील. ही निवडणूक माझ्यासाठी आधुनिक काळातील महायुद्ध आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.  लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. बीडमधील जनता नक्कीच योग्य निर्णय घेईल, असंही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं. तब्बल 18 लाखांहून अधिक मतदार संख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, ओबीसींमधला वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णायक भूमिकेत असतो. त्यामुळे आता बीडची जनता कोणता निर्णय घेणार हे पाहण्याजोगं असणार आहे.