मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि... प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान

वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत फारकत घेतलीय.

Updated: Mar 29, 2024, 04:10 PM IST
मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि...  प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान title=

Prakash Ambedkar :  भाजपच्या विरोधात मजबुत आघाडी उभी करणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे  अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.  महाविकास आघाडीसोबत चर्चेची दारं खुली आहेत. मात्र, संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देत आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

लोकसभेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आमचे मध्यंतरी चर्चा झाली.  भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी उभी राहावी असा आमचा प्रयत्न आहे.  पण आम्हाला ज्या पद्धतीची आघाडी पाहिजे होती ती उभी राहत नाही अशी परिस्थिती आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटनाशी बोलून 2 एप्रिल पर्यंत नवीन आघाडी उभी राहील असं प्रकाश आंबेडकर म्हणले.  संजय राऊत यांनी आघाडीत बिघाडी केली असा गंभीर आरोप देखीस प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात

पुण्यातील वसंत मोरेंनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. वसंत मोरे हे पुण्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांसोबत अर्ध्या तास चर्चा केली. या बैठकीत सकारामकपासून चर्चा झाली असून, उमेदवारीबाबत आंबेडकर निर्णय घेतील असं मोरेंनी म्हटले. तर, राज्यातील नवी समीकरणं जुळवण्यासाठी पुढील 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊ. राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात होणार असं सूचक विधान यावेळी आंबेडकरांनी केले.

वंचितला सोबत घेण्यासाठी मविआ अजूनही आग्रही आहे. देशातील हुकूमशाही, शोषण, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या याच्या रक्षणासाठीची लढाई प्रकाश आंबेडकरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे संविधान रक्षणासाठी आंबेडकरांची गरज आहे आणि भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत याची खात्री आहे असं राऊतांनी म्हटलं.

तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत आणखी किती खोटं बोलाल असं ट्विट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. आम्ही सोबत आहोत मग बैठकांना का बोलावलं जात नाही. हा प्रकार म्हणजे मैत्रीच्या आडून पाठीत खंजीर खुपसण्यासारखा आहे. आम्हाला पाडण्याचं षडयंत्र रचलं जातंय असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.  दरम्यान संजय राऊतच राजकारणातील सूर्याजी पिसाळ असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय... प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटवरुन नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केलीये. वंचितने घेतलेल्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल, मात्र मी लोकांची नस ओळखतो असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर वंचितसोबत आघाडीसाठी अजूनही तयार असल्याचं संजय राऊतांनी म्हटल आहे.