MPSC मध्ये सहा वेळा अपयश; सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी राज्यात आली पहिली

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजा वंजारीने मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 20, 2024, 10:04 AM IST
MPSC मध्ये सहा वेळा अपयश; सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी राज्यात आली पहिली title=

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूजा अरुण वंजारी हिने 570.25 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.  एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर ती पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आली. सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात पूजा वंजारीने हे यश मिळवलं आहे. इतकचं नाहीतर ती मुलींमध्ये राज्यात पहिली देखील आली.

900 पैकी 570.25 गुण मिळवत पूजा राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे. शैक्षणिक आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो यावर कायम विश्वास होता. त्यामुळे सहा वेळा अपयश आल्यानंतरही तिने प्रयत्न सोडले नाहीत. सातव्या वेळी पूजा यश संपादन करू शकली आणि राज्यात पहिली आली आहे. यामध्ये पूजाला तिच्या पतीचा खंबीर पाठिंबा मिळाला. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजाने सांगितले.

2014 मध्ये जेव्हा पूजा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला. माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे पूजा वंजारीने म्हटले आहे. माझ्या यशात माझे कुटुंब, माझ्या सासरच्या मंडळींचा हातभार आहे. मी दररोज सुमारे आठ तास अभ्यास करायचे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, असा मोलाचा सल्ला पूजा वंजारीने विद्यार्थ्यांना दिला आहे.

एमपीएससीमध्ये यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे. ते माझ्या बाबतीत खरंही ठरलं, असंही पूजा म्हणाली. एमपीएससी परीक्षेत पूजाला पाचवेळा अपयश आलं होतं. मात्र तिने न थांबता प्रयत्न सुरुच ठेवले. पूजाला स्पर्धा परीक्षेत 2019 मध्ये 13 गुण कमी पडले आणि पुन्हा तिची संधी हुकली. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत राज्यात पहिला येण्याचा मान पूजाने मिळवला आहे.

असा होता पूजाचा प्रवास

2015 आणि 2016 या दोन्ही प्रयत्नात पूर्वपरीक्षेत पूजा पास झाली नाही. त्यानंतर 2017 मध्ये पूजाने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली मात्र तिला यश मिळालं नाही. 2018 मध्ये पूजाला पुन्हा पूर्वपरीक्षेत अपयश आलं. निकाल पाहिल्यानंतर तासाभरातच तिने अभ्यासाला सुरुवात केली होती. 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत पुजाला 13 गुण कमी पडली आणि पुन्हा तिची संधी हुकली. त्यानंतर 2022 साली झालेल्या परीक्षेत तिला यश मिळालं आहे.