Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Job News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....   

सायली पाटील | Updated: Apr 26, 2024, 07:41 AM IST
Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप title=
Pune news man quits job celebrates his last day at work with dhols outside office video goes viral

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा वाटतो आणि हा हेवा वाटण्यात गैर असं काहीच नाही. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गडगंज पगार किंवा शनिवार रविवारच्या सुट्ट्या जणू भ्रमाचा भोपळा असतो. कारण, प्रत्यक्षात हे क्षेत्र आणि इथं काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणारे त्याचे परिणाम पाहता नेमकं कुठं गंडतंय याचा अंदाज येऊन अनेकजण विचारात पडतात. 

कागदोपत्री 8 किंवा 9 तासांचं काम फार क्वचितप्रसंगी नियमानुसार निर्धारित वेळेपुरता मर्यादित असतं. अनेकदा सुट्ट्यांना हसतच तिलांजली द्यावी लागते आणि पगारवाढीविषयी काही मंडळींशी न बोललेलंच बरं. वर्षानुवर्षं एखाद्या संस्थेमध्ये काम करूनही पगारात होणारी तुटपुंजी वाढ म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या कामाची उपरोधिक पोचपावतीच म्हणावी लागेल. त्यात खाष्ट वरिष्ठ असले की कामाच्या ठिकाणी येणारा प्रत्येक दिवस युद्धाहून कमी वाटत नाही. या अशा परिस्थितीचा सामना सध्या corporate job करणारे अनेकजण करत आहेत. 

पुण्यातील एका तरुणानंही काही वर्षांपासून अशा सर्व परिस्थितीचा सामना केला आणि अखेर बॉसच्या जाचाला, नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या नकारात्मकतेचा कंटाळून नोकरी सोडून स्वत:ला जे आवडतं ते करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडण्याच्या निर्णयापासून ते अखेरच्या दिवसापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी सोपा नसतो, खरंतर नोकरीच्या शेवटचा दिवस असंख्य आठवणी देऊन जाणारा ठरतो. या तरुणानंही हा शेवटचा दिवस खास केला, पण इतक्या अनोख्या पद्धतीत की पाहणारेही पाहतच राहिले. बरं, त्याच्या बॉसच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, पठ्ठ्या चक्क ढोल वाजवत, नाचत या कंपनीला रामराम ठोकून निघून गेला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anish Bhagat (@anishbhagatt)

पुण्यात सेल्स असोशिएट म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी केलेला कल्ला Anish Bhagat या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडीओनुसार जवळपास मागील तीन वर्षांपासून तो एका अशा कंपनीत काम करत होता जिथं त्याला नाही म्हणण्याइतकीच पगारवाढ मिळालेली, शिवाय बॉसकडून दोन चांगले शब्दही त्याला  ऐकायला मिळत नव्हते. अपेक्षांच्या याच ओझ्यानं दबलेल्या अनिकेतनं अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे मित्र त्याच्या या निर्णयानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याच्या ऑफिसखाली पोहोचले. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच 

इथं ऑफिसमधून बाहेर पडताना तो चक्क मनसोक्त नाचू लागला, आनंद अगजदी स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तितक्यातच ज्या बॉसचा उल्लेख त्यानं केला तोसुद्धा तिथं आला आणि त्याचा संताप अनावर झाला. अनिशनं हा व्हिडीओ शेअर करताना त्यामध्ये, 'तुमच्यातील अनेकजण या व्हिडीओशी एकमत करु पाहतील' असं म्हणत सध्याची तरुणाई आणि मध्यमवयीन पिढी नोकरी, अपेक्षांच्या चक्रात कशी अडकली आहे हे सांगत त्यांची होणारी घुसमट मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या Insta Reel च्या माध्यमातून अनेकांच्याच फीडवर दिसत आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?