'मी तुझ्यावर थुंकते', विरारमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा, पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ; हाताचा घेतला चावा

विरारमध्ये मद्यधुंद तरुणींनी भरस्त्यात धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत तुफान राडा घातला. मोबाईलमध्ये शूट कऱण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2024, 08:42 PM IST
'मी तुझ्यावर थुंकते', विरारमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा, पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ; हाताचा घेतला चावा title=

विरारमध्ये मद्यधुंद तरुणींनी भरस्त्यात राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दारुच्या नशेत बुडालेल्या या तरुणींनी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही हात उचलला. यामधील एका तरुणीने तीन स्टार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडत शिवीगाळ केली. यावेळी तिने थुंकण्याची भाषाही वापरली. यादरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावाही घेण्यात आला. मोबाईलमध्ये शूट कऱण्यात आलेला त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अर्नाला पोलिसांनी तिन्ही तरुणींना अटक केली आहे. 

विरार पश्चिमेच्या गोकुल टाऊनशिपमध्ये पंखा फास्ट नावाचा एक पब आहे. या पबमध्ये दोन गट आपापसात भिडले होते. अर्नाळा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. महिला कॉन्स्टेबल व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असता मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणींनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस तरुणींना पोलीस ठाण्यात येण्याची विनंती करत असताना त्यांनी मात्र मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली व राडा घातला. पोलीस अधिकाऱ्याची पकडलेली कॉलर सोडवायचा प्रयत्न केला असता तरुणीने महिला कॉन्स्टेबलच्या हाताचा चावा घेतला. 

अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल उत्कर्षा वंजारी यांनी पोलीस तक्रारीत माहिती दिली आहे की, पबमध्ये काव्या प्रधान नावाच्या तरुणीने मारहाण करत त्यांची वर्दी फाडली आणि हाताचा चावा घेतला. अश्विनी नावाच्या तरुणीने उत्कर्षा यांचे केस ओढले. उत्कर्षा यांच्या मदतीसाठी पबमधील महिला सुरक्षारक्षक आकांक्षा भोईर पुढे आल्या होत्या. पण त्यांनाही धक्काबुक्की करत टी-शर्ट फाडण्यात आलं. 

काव्या प्रधानने यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मोराले यांच्या डोक्यावर लोखंडी बादलीने हल्ला केला. तसंच पूनम नावाच्या तरुणीने धक्काबुक्की आणि मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाबेर गेल्यानंतर अतिरिक्त पोलीस मागवण्यात आले आणि तिघींना ताब्यात घेण्यात आलं. 

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी याप्रकरणी सांगितलं आहे की, "तीन तरुणी दारुच्या नशेत गोंधळ घालत असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले असता त्या तरुणींनी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांशी वाद घातला. त्यांनी पोलिसांसह अरेरावी केली. त्यांनी पोलिसांवर हातही उचलला आहे. तसंच कॉलरही पकडली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे".

Tags: