मराठवाड्याच्या पोटात दडलंय तरी काय? आंबेजोगाईत सापडला दोन प्राचीन मंदिरांचा पाया

Barakhambi Temple: बीड जिल्ह्यातील बाराखांबी मंदिर परिसरात पुरातत्व खात्याने शोध मोहिम सुरू केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 28, 2024, 05:26 PM IST
मराठवाड्याच्या पोटात दडलंय तरी काय? आंबेजोगाईत सापडला दोन प्राचीन मंदिरांचा पाया title=
two Temple Bases Found During Excavation In Ambajogai

Barakhambi Temple: मराठवाड्यातील बीड येथील आंबेजोगाई येथे करण्यात आलेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तु आणि रचना सापडल्या आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या कागि दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा परिसरातही उत्खनन करण्यात आले होते. तिथे उत्खननात जुने अवशेष सापडले होते. मराठवाड्यात पुरातत्व विभागाचे अधिकारी आता तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळं नक्की मराठवाड्याच्या पोटात दडलंय काय? असा प्रश्न केला जात आहे. 

दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा 'बीबी का मकबरा' परिसरात गेल्या महिन्याभरापासून उत्खनन सुरू आहे. त्यावेळी उत्खननात अनेक पुरातन वस्तु, रचना व अवशेष सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर परिसरात सापडलेल्या या अवशेषांमुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत असताना आता बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथेही पुरातन वास्तु सापडल्या आहेत. आंबेजोगाई येथील सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरात 15 मार्चपासून उत्खनन सुरू करण्यात आले आहे. जवळपास 50 जणांचे पथ सकलेश्वर मंदिर परिसरात तळ ठोकून बसले आहेत.

सकलेश्वर मंदिर येथे उत्खननाचे काम सुरू असताना 10 दिवसांतच दोन मंदिरांचा पाया आढळून आला आहे. यापूर्वी 2018मध्ये उत्खनन करण्यात आले होते. तेव्हादेखील तीन पुरातन मंदिरांचे अवशेष आढळून आले होते. आता पुन्हा एकदा दोन मंदिराचे अवशेष आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकलेश्वर मंदिराचे निर्माण 1228 इसवी सनात यादव राजवंशांनी बांधले आहे.  एका शिलालेखानुसार, ते देवगिरी किल्ल्याचे शासक होते. सकलेश्वर मंदिराला बाराखंबी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सकलेश्वर मंदिर परिसरात 15 मार्चपासून खोदकाम करण्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येकी 100 वर्गफुट परिसरात शोधकाम करण्यात आले होते. 

पुरातत्व विभागाला या परिसरात दोन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. त्यातील एकाचे नाव खोलेश्वर असून ते यादव जनरल यांच्या नावाने ठेवण्यात आले आहे. तर, खोदकामादरम्यान काही प्राचीन वीटादेखील सापडल्या आहेत. जे मंदिराच्या कळसाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यातबरोबर, हात व पायांच्या आकाराचे मूर्तीकलादेखील खोदकामात समोर आल्या आहेत. 

दरम्यान, आंबेजोगाई शहराला प्राचीन काळात अमरापुर, जयंतीपुर, जोगायम्बे नावाने ओळखले जायचे. तसंच, हैदराबादच्या निजामच्या काळात मोमिनाबाद नावानेही ओळखले जायचे. या शहरात हत्तीखाना, दासोपंत मंदिर, योगेश्वरी मंदिरासारखी स्मारकदेखील आहेत.