'हा पूर्वनियोजित कट...', गाडीवर दगडफेक झाल्यानंतर वंचितच्या महिला उमेदवाराची प्रतिक्रिया

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 8, 2024, 11:43 AM IST
'हा पूर्वनियोजित कट...', गाडीवर दगडफेक झाल्यानंतर वंचितच्या महिला उमेदवाराची प्रतिक्रिया title=

Utkarsha Rupavate Car Vandalized : लोकसभा निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. आता येत्या 20 मे रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला माझ्या एकटीवर नसून नेतृत्व करु पाहणाऱ्या प्रत्येक महिलेवर असल्याची प्रतिक्रिया उत्कर्षा रुपवते यांनी दिली आहे.  

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची दुहेरी वाटणारी लढत वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी ठरणार आहे. काँग्रेसने ठाकरे गटाला जागा सोडल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते या वंचितकडून मैदानात उतरल्या आहेत. उत्कर्षा रुपवते यांचा गावोगावी झंझावाती दौरा सुरु असून त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सोमवारी 6 मे रोजी अकोले तालुक्यात भेटीगाठी सुरु असताना रात्री अचानक उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रुपवते यांना कोणतीही इजा झालेली नाही. पण त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता या प्रकरणाबद्दल उत्कर्षा रुपवते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गेल्या 25 वर्षांपासून मी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देत आहे. आता मी निवडणूक लढवत असल्याने कुणी हा हल्ला घडवला हे जनतेला ठाऊक आहे. याचे रुपांतर मतपेटीत दिसेल", असा विश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला आहे.  

हा पूर्वनियोजित कट

"मला माझ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा चांगला जनसंपर्क मिळत आहे. मला समोरच्या उमेदवारांची भीती वाटत नाही कारण ते कोणावर तरी निर्भर आहेत. आम्ही सगळे स्वयंभू आहोत आणि लोकांमध्ये उतरून प्रचार करत आहोत. काल माझ्या गाडीवर हल्ला झाला आणि माझ्याच बाजूची काच फुटली. मला इजा व्हावी यासाठी हा पूर्वनियोजित कट होता", असे उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले. 

विरोधकांकडून हा प्रकार केला गेला असावा

"माझ्या मतदारसंघात माझं काम जोरदार सुरु असल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी विरोधकांकडून हा प्रकार केला गेला असावा. एखादी महिला एखादा काम करण्यासाठी पुढे येते. त्यानंतर तिच्यावर असा हल्ला होतो. हा हल्ला माझ्या एकटीवर नाही, तर नेतृत्व करु पाहणाऱ्या सर्व महिलांवर हा हल्ला आहे. तसेच हा हल्ला अतिशय निराशाजनक आणि निंदनीय आहे. माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजितच असून या हल्ल्याचे रुपांतर मतपेटीत दिसेल", अशी प्रतिक्रिया उत्कर्ष रूपवते यांनी दिली.