वसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार?

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असून गेल्या 15 दिवसांपासून बिबट्या मोकाट फिरत आहे. त्यामुळं नागरिक आक्रमक झाले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 16, 2024, 12:12 PM IST
 वसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार? title=
vasai News leopard at vasai fort area forest department urge to stop roro service after 6 pm

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर आहे. गेल्या 15 दिवसांपासून किल्ला परिसरात बिबट्या मोकाट फिरत आहे. त्यामुळं या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी अद्यापही वनविभागाला यश आले नाहीये. या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच, बिबट्यामुळं कोणाच्या जीवालाही धोका होऊ नये यासाठी संध्याकाळी 6 नंतर रोरो बोटीच्या सेवा बंद कराव्यात, अशी मागणी वनविभाग, पुरातत्व विभागाने महाराष्ट्रा सागरी मंडळाला केली आहे. 

वसईच्या किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवाशांचे वास्तव्य आहे. येथेच 29 मार्च रोजी बिबट्या आढळला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्येही बिबट्याचा वावर कैद झाला होता. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाने मोहिम उभारली आहे. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाहीये. नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

15 दिवस उलटून गेल्यानंतरही वसई किल्ला परिसरात फिरणारा बिबट्या अद्यापही मोकाट आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी परतणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसंच, नागरिकांनी रात्रीचा प्रवास करणे टाळावे, असं अवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा बिबट्या तुंगारेश्वर अभयारण्यातून वसई किल्ला परिसरात आला आहे. त्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि आवश्यक पिंजरे लावण्यात आले आहेत. परंतु, बिबट्या जेव्हा बाहेर येतो तेव्हा सातत्याने मानवी वर्दळ आणि रोरो सेवेच्या फेऱ्या यामुळं त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत. 

दरम्यान, बिबट्याचा वावर असल्याने संध्याकाळी 6नंतर रो रो सेवा बंद करावी, असे अवाहन वन विभागाने केले आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाला तसे लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. त्यामुळं आता वनविभागाच्या या पत्राला सागरी मंडळ काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सहानंतर खरंच फेरी बंद करणार की त्यावर काही तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

रो-रो सेवेचे वेळापत्रक

रो-रो बोटीची वाहन क्षमता 50 दुचाकी, 30 चारचाकी वाहनांची असणार आहे. प्रवासी क्षमता 100 पेक्षा जास्त असणार आहे. नागरिकांना या बोटीतून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहे. सध्या 13 फेऱ्यांची वेळ ठरवण्यात आली आहे.