सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीच

Sangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 22, 2024, 03:39 PM IST
सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीच title=
Vishal patil not withdrawing the application from sangali

Vishal patil In Sangali loksabha election 2024 : पश्चिम महाराष्ट्रील राजकारणाचं केंद्रस्थान असलेला सांगलीचा किल्ला कोण राखणार? असा सवाल विचारला जात होता. ठाकरे गटाने बाजी मारली खरी पण तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील यांनी दंड थोपटले होते. अखेर आता सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम असणार आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने आता अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवतील. त्यामुळे आता विशाल पाटलांचा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. आज दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने आता सांगलीत त्रिशंकू लढत होणार आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत. आत्तापर्यंत 25 पैकी शेवटच्या दिवशी पर्यंत 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंतदादा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. त्यामुळे विशाल पाटील मागे हटणार नाहीत, हे निश्चित झालं होतं.

सांगलीचं राजकीय गणित

1952 ते 2019 पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह 19 निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने सोळा वेळा विजय साकारलाय. तर 1980 ते 2014 या काळात म्हणजे 34 वर्षात  वसंतदादा पाटील घराण्याचंच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी प्रतिक पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली. मात्र विशाल पाटील यांना संजयकाका पाटील यांनी धुळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं.

दरम्यान, काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विशाल पाटील यांना विधान परिषदेचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर बाळासाहेब थोरातांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी विशाल पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, तरी देखील विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. याचा फायदा आता भाजपला होणार का? असा सवाल विचारला जात आहे.