Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी.. आता अजित पवार असताना फडणवीसांना बारामतीमध्ये का उतरावं लागतंय?

सौरभ तळेकर | Updated: Apr 18, 2024, 09:41 PM IST
Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय? title=
Devendra Fadnavis campaigning in baramati

Devendra Fadnavis In baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी (Sunetra Pawar) फडणवीस मैदानात उतरले आहेत. पुणे मुक्कामी असताना फडणवीसांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) बैठकही केली. भाजप पदाधिकारीसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली? याचा खुलासा फडणवीसांनी या बैठकीत केला. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही म्हणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला. शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता, नंतर तो बदलला असा गौप्यस्फोटही फडणवीसांनी केलाय. मात्र, अजितदादा असताना देखील महायुतीत बारामतीत फडणवीसांना मैदानात उतरावं लागतंय.

विजय शिवतारेंचं बंड शमवलं

सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिलं बंड केलं ते शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी.. बारामती कोणाचा सातबारा नाही म्हणत शिवतारेंनी अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकलं. मात्र शिवतारेंचं हे बंड शमवण्यात मोठा वाटा होता तो देवेंद्र फडणवीसांचा.. देवेंद्र फडणवीसांनी शिवतारेंची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली अन् अजितदादांचा रस्ता मोकळा केला. 

हर्षवर्धन पाटलांसोबत शिष्टाई

अजित पवारांनी बारामतीची लढाई जिंकायची तर साथ हवी होती ती भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची.. मात्र अजित पवारांमुळे दुखावलेल्या हर्षवर्धन पाटलांची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत दूर केली. हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना साथ दिली अन् इंदापूरची ताकद अजितदादांसोबत आली.

सुनेत्रांसाठी फडणवीस मैदानात का?

राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्यासाठी भाजप आणि संघ कार्यकर्ते नाखूष असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांविरोधात दौंड आणि इंदापूरमध्ये नाराजी असल्याने खुद्द फडणवीसांना मैदानात यावं लागलंय. फडणवीसांनी इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला अन् मार्गदर्शन केलं. खडकवासला शहरी मतदारसंघात भाजप आणि संघाची मोठी ताकद असल्याने खडकवासलामध्ये सुनेत्रांसाठी काम करावं यासाठी फडणवीसांची फिल्डिंग लावली.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याविरोधात जिथे जिथे नाराजी आहे, तिथे फडणवीस डॅमेज कंट्रोलचं काम करत आहेत. बारामतीची लढाई ही फक्त काका आणि पुतण्याची नाही. तर महायुतीसाठी आणि भाजपचं मिशन 400 पारमध्येही अत्यंत महत्त्वाची आहे. बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहायचा असेल तर सुनेत्रा पवारांचा विजय आवश्यक आहे. आणि त्यासाठीच फडणवीस मैदानात उतरले आहेत.