दादर मेट्रो स्थानकाचे काम सुरू; 25 एप्रिलपासून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रोच्या कामासाठी दादर येथे वाहतुक वळवण्यात येणार आहे. कसं असेल नियोजन, वाचा 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 25, 2024, 03:49 PM IST
दादर मेट्रो स्थानकाचे काम सुरू; 25 एप्रिलपासून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग title=
Dadar Metro Station Work To Begin Traffic Diversions To Be In Effect From April 25

Mumbai Metro 3: मुंबई शहरात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. विविध ठिकाणी मेट्रोमुळं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCl)कडून मेट्रो लाइन 3 म्हणजेच दादर भूमिगत मेट्रो स्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळं दादर येथील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. मेट्रो स्थानकाच्या कामामुळं वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 

दादर येथील स्टीलमन जंक्शन, सेनापती बापट मार्ग यासारख्या ठिकाणी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मेट्रोमुळं काही भाग बंद करण्यात आल्याने गोखले रोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे, असं मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळं वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हे नवीन बदल 25 एप्रिलपासून लागू होणार आहेत. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट अण्णा टिपणीस चौक- स्टीलमन जंक्शन ते गडकरी चौक या दरम्यानच्या रस्त्यांवर काम सुरू असल्याने याचा परिणाम वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक वळवण्यात येणार आहे. मेट्रो 3 च्या बांधकामामुळं गोखले रस्ता आणि आसपासच्या भागातील वाहतूक वळवण्यात येणार आहे. 

गोखले रोडच्या उत्तरेकडेली बाजू गडकरी चौक ते स्टीलमन जंक्शन सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर, दक्षिणेकडील मार्ग नेहमीप्रमाणे खुले राहणार आहेत. रहदारीचा मार्गात कोणतेही अडथळे टाळण्यासाठी दोन्हीकडील बाजूला नो-पार्किंग म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 

सेनापती बापट पुतळा (सर्कल) येथून रानडे रोडवरील स्टीलमन जंक्शनकडे जाण्यास वाहनांना बंदी असणार आहे. कारण हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. पोर्तुगीज चर्चकडून गोखले रोडवरील उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांनी स्टीलमन जंक्शनपासून डावीकडे वळण घेऊन रानडे रोड, दादासाहेब रेगे रोड, गडकरी जंक्शनवरुन जाता येणार आहे. तर, दादर टीटीकडे जाणाऱ्या वाहनांनी स्टीलमन जंक्शनपासून उजवीकडे रानडे रोड, पणरी जंक्शनने डावीकडे वळण घेत एनसी केळकर रोड, कोतवाल गार्डनच्या बाजूने त्यांच्या निजोजित ठिकाणी जाऊ शकतात. 

दादरमधील गजबजलेल्या ठिकाणांवर आधीच वाहतुक कोंडी असल्याने आता पुन्हा वाहतुकीत बदल करण्यात आल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्यामुळं मुंबई वाहतुक पोलिसांनी MMRCLला या सप्टेंबरपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माहिममध्ये शितलादेवी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर दादर आणि वरळी अशी मेट्रो 3ची स्थानके असणार आहेत.